कासवसंवर्धन अडकले ‘उपचारां’च्‍या जाळ्यात; जखमी कासवांवर औषधोपचार धोरणनिश्‍चिती हवी

अवित बगळे
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

वन खात्याने कासव संवर्धन व संरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शक दस्तावेज तयार करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. त्यांनी कामही सुरू केले आहे. किनाऱ्यांवर भेट देऊन स्थानिकांचे म्हणणेही त्यांनी जाणून घेतले आहे. कासव संवर्धनासाठी सरकार अशा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. यानिमित्ताने कासव संवर्धनाची ‘दशा आणि दिशा’ यावर प्रकाश टाकणारी वृत्तमालिका आजच्या अंकापासून

पणजी: समुद्रकिनाऱ्यावर कासव सापडणे, मच्छीमारांच्या जाळ्यात कासव सापडणे, या गोष्टी नव्या नाहीत. राज्यातील काही किनारे कासवांनी अंडी घालावीत, यासाठी आरक्षित केले आहेत. हे असे असले तरी कासवांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज असा दवाखाना राज्यात उभा राहू शकला नाही हेही वास्तव आहे.

कासवांची प्रजाती ही वन्यप्राणी संरक्षण कायद्याच्या परिशिष्टात येत असल्याने कासव सापडल्यानंतर तो मत्स्योद्योग खात्यापेक्षा वन खात्याचा विषय होतो. वनाधिकारी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खात्याच्या दवाखान्यांत उपचार करतात आणि कासव परत समुद्रात सोडतात. खरेतर कासवांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची गरज असते. त्याचा अभाव गेली काही वर्षे जाणवत आहे. आता वन खात्याने कासव संवर्धनासाठी काय केले जावे, याचा अभ्यास सुरू केला आहे. तसा अहवाल महिना, दोन महिन्यांत तयारही होईल. मात्र, जखमी कासवांवर उपचार करण्यासाठी खास आणि सुसज्ज दवाखान्याची गरज आहे.

पशुवैद्यकीय खात्याने गावोगावी दवाखाने, इस्पितळे उभी करताना कासवांवरील उपचार हे गृहित धरले नव्हते. त्यामुळे कोणत्याही दवाखान्यांत कासवांवर उपचारासाठी तज्ज्ञ नाही की, लागणारी खास व्यवस्था. या सगळ्याच्या अभावीही वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी चांगले काम करत आहेत. जखमी कासव सापडल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचतात आणि कासवावर योग्य ते उपचार होतील, याची काळजी घेतात.

धोरणनिश्‍चिती हवी
मोरजी, आश्वे, तळपण, गालजीबाग किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी येतात. यासाठी वाणिज्यिक उपक्रमापासून हे किनारे वेगळे ठेवले आहेत. या किनाऱ्यांवर शॅक घालण्यासाठीही सरकार परवानगी देत नाही. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडेही हे किनारे कासवांसाठी आरक्षित असल्याची नोंद आहे. त्यामुळे कोणताही वाणिज्यिक उपक्रम या किनाऱ्यावर प्राधिकरण मंजूर करत नाही. कासवे येतात अंडी घालून जातात. जखमी कासवे किनाऱ्यावर येतात, काही जाळ्यांमध्ये सापडून जखमी होतात. त्यांचे संवर्धन, संरक्षण कसे करावे याची पद्धती वन खात्याने निश्चित केलेली नाही. त्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कासवांसाठीचा दवाखाना उभा राहणेही आता फार दूर नाही असे दिसते.
(क्रमशः)

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या