समुद्रकिनारे बनले कासवांचे माहेरघर; आगोंद, गालजीबाग किनाऱ्यावर पोषक वातावरण

समुद्रकिनारे बनले कासवांचे माहेरघर; आगोंद, गालजीबाग किनाऱ्यावर पोषक वातावरण
Goa: Turtles coming out from nests by Avit Bagle

पणजी: दक्षिण गोव्यातील आगोंदचा किनारा लांबीने अत्यंत कमी म्हणजे केवळ दोन किलोमीटरचा आहे. या किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या किनाऱ्यावर कासवे अंडी घालण्यासाठी येतात.

गालजीबाग नदी जेथे अरबी समुद्राला मिळते, तेथेही कासवे अंडी घालण्यासाठी येतात. कासवांची आणि अंड्यांची संख्या दरवर्षी कमी जास्त होत असली तरी कासवे सातत्याने एकही वर्ष वाया न घालवता या दोन्ही किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येतात हे विशेष होय. हे किनारे रुंद असल्याने कासवांनाही अडी घालण्यासाठी भरपूर जागा या किनाऱ्यांवर उपलब्ध होत असते. वाळूच्या टेकड्या आणि सागरी वनस्पती यांनी समृद्ध असे हे किनारे आता कासवांचे माहेरघर झाले आहेत.

वन खात्यानेही स्थानिकांना स्वयंसेवक म्हणून नेमत किनाऱ्यावर गस्त घालण्याची, कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करण्याची, कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात जातील याची काळजी घेण्याची व्यवस्था केली आहे.  मोरजीच्या धर्तीवर या किनाऱ्यांवरही रात्रीच्या वेळी प्रखऱ प्रकाशझोत असलेले दिवे पेटवण्यास, मोठ्याने संगीताचा आवाज करण्यास, किनाऱ्यावर वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांना संरक्षण मिळत असले तरी जाळ्यांत सापडून जखमी होणाऱ्या कासवांची संख्या मोठी आहे. दरवर्षी किमान २० कासवांची सुटका करावी लागते. यासाठी स्वयंसेवकांना पुरेसे प्रशिक्षण देणे आणि कासवांवर उपचारासाठी दवाखाना सुरु करणे आदींची गरज आहे.

(समाप्त)

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com