फोंडा पालिकेत भाजपची दोन मते फुटली?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

सध्या फोंडा पालिकेत नगराध्यक्ष भाजपचा तर उपनगराध्यक्ष मगोचा अशी स्थिती असून यापुढे भाजप नगरसेवक व फोंड्यातील भाजपचे नेते कोणती रणनीती आखतात, यासंबंधी सध्या फोंड्यात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

फोंडा: निवडणुकीनंतर भाजपची दोन मते फुटली तर मगोचे एक मत भाजपला मिळाले, अशी चर्चा सुरू होती, मात्र गुप्त मतदानामुळे त्याला कायदेशीर दुजोरा मिळाला नाही. गुप्त मतदान असल्याने कुणी कुणावर आरोप करू शकत नाही, तरीपण कुणी कुणाला मतदान केले, ते आम्हाला कळले असल्याचे भाजपच्या काही नेत्यांनी खासगीत बोलून दाखवले. सध्या फोंडा पालिकेत नगराध्यक्ष भाजपचा तर उपनगराध्यक्ष मगोचा अशी स्थिती असून यापुढे भाजप नगरसेवक व फोंड्यातील भाजपचे नेते कोणती रणनीती आखतात, यासंबंधी सध्या फोंड्यात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

फोंडा पालिकेत उपनगराध्यक्षपदासाठीच्या या निवडणुकीसाठी बोलावलेल्या बैठकीला सर्व पंधराही नगरसेवक उपस्थित होते. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी खास उपस्थिती या बैठकीला लावली होती. मात्र, निवडणुकीत भलतेच चित्र दिसल्याने ते निघून गेले. निवडणुकीचे कामकाज क्‍लेन मदेरा यांनी हाताळले, तर पालिका मुख्याधिकारी केदार नाईक यांनी त्यांना सहकार्य केले. 

उपनगराध्यक्ष निवडीवेळी भाजपच्या नगरसेवकांनी मगोला समर्थन केल्याने पुन्हा एकदा मगोचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. ज्या दुर्गाभाटमधून मगोचे वर्चस्व सिद्ध झाले होते, तेथूनच आता पुन्हा एकदा सुरवात झाली असून भाजप नगरसेवक हे मगोचे समर्थक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मगोला फोंड्यात चांगली संधी असून आमचे नेते सुदिन ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचे सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहोत. 
- डॉ. केतन भाटीकर (फोंडा मगो पक्ष नेता)

माझ्या समर्थक नगरसेवकांमुळेच मी उपनगराध्यक्षपदी निवडून येऊ शकले, त्यामुळे नगरसेवक व मगो नेत्यांसह सर्वांचे आभार व्यक्त करते. फोंडा पालिकेतील प्रभागांच्या विकासासाठी मी कटीबद्ध असून सर्वांच्या सहकार्याने विकासकामे मार्गी लावली जातील. 
- अमिना नाईक (उपनगराध्यक्ष, फोंडा पालिका)

फोंडा पालिकेत मगोचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले आहे. फोंडा मतदारसंघात मगोचे कार्य जोरात सुरू असून मतदारांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- अनील नाईक (फोंडा मगो अध्यक्ष)

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या