GOA : लसीकरण 5 लाखांवर; पहिला डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू

GOA : लसीकरण 5 लाखांवर; पहिला डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू
goa coronavirus.jpg

पणजी: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Covid 19) संकट घोंघावत असताना राज्यात (Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग रुग्णांच्या पॉझिटिव्हीटीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी (21.68 टक्के) होत आहे ही दिलासादायक बाब आहे. गेल्या चोवीस तासात 32 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर नवीन 1055 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सक्रिय कोरोना बाधितांचे प्रमाणही कमी (15,326)झाले आहे. मृत्यू झालेल्यांपैकी दोघा रुग्णांनी लसीकरणाचा (Vaccination) पहिला डोस घेतलेले होते, अशी माहिती आरोग्य संचालनालयाने जारी केलेल्या माहिती नमूद केले आहे.  (GOA Two people died after taking the first dose of vaccination)

काही दिवसांपूर्वी राज्यात सक्रिय असलेल्या कोरोना संसर्गाची संख्या 35 हजारांवर पोचली होती तसेच रुग्णांच्या पॉझिटिव्हीचे प्रमाण 52 टक्क्यांवर पोचले होते तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 70 टक्क्यांवर आले होते ते आता 88.34 टक्क्यांवर गेले आहे. गेल्या चोवीस तासात राज्यातील विविध इस्पितळ तसेच आरोग्य केंद्रामध्ये 4,665 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1055 जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. 123 जणांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे तर 932 जणांनी गृह अलगीकरण स्वीकारले आहे. आज 154 रुग्ण इस्पितळातून बरे होऊन घरी परतले आहेत तर गृह अलगीकरणातील 1396 जण बरे झाले आहेत अशी माहिती संचालनालयाने दिली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (154) नव्याने दाखल झालेल्यांपेक्षा (123) अधिक आहे. 

गेल्या चोवीस तासास 32 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला त्यातील 9 जणांचे वय 50 वर्षापेक्षा कमी होते. मृत्यूची संख्या 2570 वर पोचली आहे. 18 जणांचा गोमेकॉ इस्पितळात, 10 जणांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात तर 4 जणांचा व्हिजन, व्हिक्टर व मदर केअर इस्पितळात मृत्यू झाला आहे. कोविड इस्पितळात मध्यरात्रीच्यावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक असायची मात्र गोवा खंडपीठने याप्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर राज्यातील कोरोना व्यवस्थापनची घडी सुरळीत झाली आहे. 

राज्यात सध्या 12,326 कोरोना रुग्ण सक्रिय आहे. मडगाव क्षेत्रात सर्वाधिक (1391) संक्रमित आहेत. त्यापाठोपाठ पणजी (881) व फोंडा (832) हे परिसर आहेत. या दोन्ही परिसरात संक्रमित रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आसपास पोचली होती. ती आता निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. इतर भागामध्येही संसर्गित रुग्णांची संख्या कमी होत आहे. उत्तर गोवा कोविड निगा केंद्रामध्ये 371 पैकी 268 तर दक्षिण गोवा कोविड निगा केंद्रामध्ये 230 पैकी 173 खाटा शिल्लक आहेत. 

ताळगाव, सांताक्रुझ, कुंभारजुवे 
मतदारसंघातील सूक्ष्म कन्टेन्मेंट क्षेत्र 

तिसवाडीतील ताळगाव, सांताक्रुझ व कुंभारजुवे या मतदारसंघातील सूक्ष्म कन्टेन्मेंट क्षेत्र झोन रद्द करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातचा आदेश आज उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यानी काढला आहे. ताळगावातील भाटले, सांतिनेझ, करंझाळे व व्हटलेभाट तेथील चार ठिकाणे तसेच सांताक्रुझ येथील सात तर कुंभारजुवेमधील दोन ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमामात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून आल्याने सूक्ष्म कन्टेन्मेंट क्षेत्र म्हणून गेल्या महिन्यात घोषित करण्यात आले होते. या भागातील कोरोना संसर्ग रुग्ण बरे होऊन प्रमाण कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यानी आदेश मागे घेतला आहे.  

कन्टेन्मेंट मार्गदर्शक तत्वांच्या
मुदतीत केंद्राकडून वाढ 

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 24 एप्रिलला कन्टेन्मेंटसंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली होती त्याची मुदत येत्या 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यासंदर्भातचा आदेश केंद्राने सर्व राज्यांना तसेच केंद्र शासित प्रदेशांना पाठविला आहे. ज्या भागात कोरो संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे किंवा गेल्या आठवड्यात अधिक होते किंवा इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या खाटांच्या 60 टक्के आहे, त्यांना हे मार्गदर्शक तत्वे लागू आहेत. यामध्ये परिस्थितीनुसार राज्य व केंद्र शासित प्रदेशांना त्यामध्ये सुधारणा करण्यास मुभा असेल असे केंद्राचे गृह सचिव अजय भल्ला यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लसीकरणचा ५ लाखांचा टप्पा पार 

राज्यात पहिला व दुसरा लसीकरणाचा डोस घेतलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींची संख्या 5 लाखांवर पोहचली आहे. आज दिवसभरात इस्पितळे व आरोग्य केंद्र येथे 2900 जणांनी तर 36 टिका उत्सव केंद्राच्या मोहिमेद्वारे 2459 जणांनी लसीकरण करून घेतले. आतापर्यंत पहिला लसीचा डोस घेतल्यांची संख्या 3 लाख 12 हजार 532 वर तर दोन्ही डोस घेतल्यांची संख्या 95 हजार 968 वर पोहचली आहे. राज्याला 7 लाख 31 हजार 720 लसीचे डोस केंद्राकडून मिळाले आहेत. त्यापैकी 2 लाख 60 हजार लसीचे डोस शिल्लक आहेत. 18 ते 45 वर्षाखालील 32 हजार 879 जणांना डोस देण्यात आला आहे तर 6360 डोस शिल्लक आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com