गोवा विद्यापीठाच्या परीक्षा आधी ठरल्यानुसारच होणार

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने पुढील तारखेला परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी करणाऱ्या एका विद्यार्थी संघटनेला परीक्षा वेळेतच होतील, असे कळविल्याची माहिती प्रभारी कुलसचिव राधिका नायक यांनी ‘गोमन्तक'ला दिली. 

पणजी : महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षा या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील. राज्यातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी सायंकाळी बैठक पार पडली, त्यात सर्व प्राचार्यांनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे परीक्षा ठरल्यानुसारच होईल. अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने पुढील तारखेला परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी करणाऱ्या एका विद्यार्थी संघटनेला परीक्षा वेळेतच होतील, असे कळविल्याची माहिती प्रभारी कुलसचिव राधिका नायक यांनी ‘गोमन्तक'ला दिली. 

विद्यापीठाच्या सभागृहात सायंकाळी राज्यातील विविध प्राचार्यांची बैठक पार पडली. त्यात कुलगुरू व परीक्षेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्राचार्यांकडून अभ्यासक्रम पूर्ततेविषयीची माहिती जाणून घेण्यात आली. अनेक प्राचार्यांनी अभ्यासक्रम पूर्ण झाला असून, त्या-त्या विषयाच्या शिक्षकांकडून आम्ही सतत माहिती घेत असतो. त्यामुळे विद्यापीठाने ठरविलेल्या तारखेलाच परीक्षा घ्याव्यात, या मतावर सर्वांनी एकमत असल्याचे जाहीर केले. विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधीला विद्यापाठाने आपली परीक्षा पुढे ढकलण्याची केलेली मागणी मान्य न केल्याचा संदेश व्हॉट्सॲपवरून पोहोचविला आसल्याचे प्रभारी कुलसचिव नायक यांनी सांगितले. 

 

अभाविपने दिले होते निवेदन

गोवा विद्यापीठाने ज्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. त्या परीक्षा आम्ही अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने पुढील तारखेला घ्याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरू वरूण साहनी आणि प्रभारी कुलसचिव राधिका नायक यांना आज सकाळी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत परिषदेच्या सदस्यांनी सांगितले की, अद्यापि काही विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. आम्ही विद्यापीठाने जे ४ ते २३ जानेवारी अशी तारीख परीक्षेसाठी निश्‍चित केली होती, त्या तारखेला विद्यापीठाने परीक्षा घेऊ नये. २३ नंतर परीक्षा घ्यावी.

संबंधित बातम्या