कोविड रुग्‍णांसाठी आणखी एक वॉर्ड: आरोग्‍यमंत्री विश्‍वजित राणे

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

मंत्री विश्‍वजित राणे म्हणाले की, या बैठकीत केंद्र सरकार आणि आरोग्यविषयी विमा योजना याची चर्चा झाली. गोमेकॉतील ११३ क्रमांकाचा वॉर्ड तत्काळ सेवेसाठी निर्माण केला जाईल.

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) आणि फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी असलेल्‍या खाटा (बेड) फुल्ल झाले आहेत. त्‍यामुळे गोमेकॉतील ११३ वॉर्ड तत्काळ उपचारासाठी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज आपल्या सरकारी निवासस्थानी आरोग्य खात्याच्या मंत्री, सचिव, अधिकाऱ्यांसमवेत सध्याच्या कोरोना विषयक स्थितीवर आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मंत्री विश्‍वजित राणे म्हणाले की, या बैठकीत केंद्र सरकार आणि आरोग्यविषयी विमा योजना याची चर्चा झाली. गोमेकॉतील ११३ क्रमांकाचा वॉर्ड तत्काळ सेवेसाठी निर्माण केला जाईल. त्याचबरोबर आणखी एक वॉर्डही कोविड रुग्णालयांसाठी वापरणार असल्याने गोमेकॉमध्ये ६० खाटांची सोय होईल. फोंड्याचे उपजिल्हा रुग्णालय फुल्ल झाले आहे. मडगावचे जिल्हा रुग्णालयात १५० खाटा आहेत आणि आणखी २०० खाटा वाढविण्यात येतील. २७० व्हेंटिलेटर असून, राज्य सरकार कोविडच्या रुग्णांना सर्व सुविधा मोफत देत आहेत. खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना  खाटा आरक्षित ठेवण्यास सांगूनही अद्याप काही रुग्णालयांनी ते ठेवले नाहीत, त्‍यांचा आढावा घेतला जाईल.

कोविड केअर केंद्र
उत्तर गोवा- एकूण खाटांची क्षमता- ५४५- राखीव खाटा-२६०
दक्षिण गोवा- एकूण खाटांची क्षमता-१००६- राखीव खाटा ५३३

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या