म्हापसा मासळी मार्केट इमारतीला गळती; टेरेसवर गवत

म्हापसा मासळी मार्केट इमारतीला गळती; टेरेसवर गवत
Goa: Water leakage of Mapusa fish market building

म्हापसा: म्हापसा बाजारपेठेतील पालिकेच्या मासळी मार्केट इमारत प्रकल्पाच्या टेरेसवर सध्या पाणी तुंबले असून तिथे गवतही उगवले आहे. सुमारे सात वर्षांपूर्वीच्या या इमारतीला सध्या गळती लागली आहे. या इमारत प्रकल्पाची पुरेशी निगा राखण्यात पालिकेने गेल्या दोन वर्षांपासून पूर्णत: दुर्लक्ष चालवलेले आहे.

सध्या या इमारतीच्या टेरेसवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. यंदा पावसाळ्याची सुरुवात झाल्यापासून ते पाणी तसेच साठून असल्याने तिथे बुरशी निर्माण झाली आहे. त्या कुजकट-दुर्गंधीयुक्त पाण्यात डांसांची पैदास होत असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या टॅरेसवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून, त्याबरोबरोबरच काही ठिकाणी छोटी-मोठी रोपटीही आहेत. या एकंदर प्रकारामुळे या मासळी व मांस विक्री प्रकल्पातील तसेच त्यालगतच्या स्टॉल्समधील विक्रेते व दुकानदारांच्या जीवितास धोका आहे. 

कारण, असे व्यावसायिक त्या ठिकाणी प्रतिदिन किमान दहा-बारा तास असतात. तसेच, ग्राहकवर्गाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते अतिशय अपायकारक आहे. या इमारत प्रकल्पाचे बांधकाम होऊन अवघीच सुमारे सात वर्षे झाली असताना इमारतीला गळती कशी काय लागली, असा सवाल काही सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. म्हापशातील एक क्रियाशील सामाजिक कार्यकर्ता शेखर नाईक यांनी हा मुद्दा काही नगरसेवकांच्या नजरेस आणून दिलेला आहे. सामाजिक माध्यामांद्वारेही त्यांनी यासंदर्भात आवाज उठवलेला आहे.  

या इमारतीची निगा राखण्याच्या बाबतीत म्हापसा पालिकेकडून गेली सुमारे दोन वर्षे काहीच करण्यात आले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. टेरेसवर काही ठिकाणी भंगारातील वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे, बाजूच्या इमारतींमधील लोकांचे लक्ष या टेरेसवर केल्यास त्यांना त्या टेरेसवरील ओंगळवाणे दृश्य दिसून येते. टेरेसचा एकंदर परिसर विद्रूप झालेला आहे.

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com