कोलवाळमधील मुख्य जलवाहिनी फुटली; बार्देशमध्ये आज मर्यादित पुरवठा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

या घटनेमुळे गुरुवार १७ रोजी पूर्ण बार्देश तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा असेल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता नेरूलकर यांनी स्पष्ट केले आहे.

कोलवाळ: कोलवाळ येथे बिनानी कंपनीच्या परिसरात राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण काम सुरू असताना महामार्गाच्या लगत असलेली मुख्य जलवाहिनी आज सकाळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. जलवाहिनीची दुरुस्ती करताना बराच त्रास झाला असला तरी अखेर दुपारपर्यंत त्यांना त्या कामात यश आले.

या घटनेमुळे गुरुवार १७ रोजी पूर्ण बार्देश तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा असेल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता नेरूलकर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षभरात कोलवाळ, गोठण, करासवाडा या भागांत मुख्य जलवाहिनी फुटण्याच्या अनेक लहान-मोठ्या घटना महामार्गाच्या रुंदीकरण कामामुळेच घडलेल्या होत्या.

ही मुख्य जलवाहिनी असल्याने व पाण्याचा उच्च दाब असल्याने दुपारपर्यंत पाणी वाया जात होते. अखेर जलवाहिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात रिक्त झाल्यानंतरच दुरुस्ती करणे शक्य झाले. तथापि, त्याबाबतही कित्येक समस्या निर्माण झाल्या होत्या. जलवाहिनी फुटण्यास महामार्गाचे रुंदीकरण करणारी ‘एमव्हीआर इन्फ्रा’ ही कंपनी जबाबदार असल्याचे खात्याच्या एका वरिष्ठ अभियंत्याने स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम खाते व महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त सहकार्याने अस्नोडा ते पर्वरीपर्यंत सुमारे अकरा कोटी रुपये खर्च करून एक हजार मिलिमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी घालण्याचे काम जोरात सुरू करण्यात आले आहे. कोलवाळ येथे महामार्गाच्या बाजूला नवीन जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करणाऱ्या जेसीबी यंत्राचा धक्का पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला लागल्यामुळे त्या जलवाहिनीला भगदाड पडून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता तसेच नवीन जलवाहिनी घालण्यासाठी चाललेल्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदारी सोपवलेले पाणीपुरवठा विभागाचे साहाय्यक अभियंता गणपत सिद्धये यांनी तातडीने हालचाली करून कंत्राटदाराला योग्य मार्गदर्शन केले व जुनी जलवाहिनी दुरुस्त करण्यास सहकार्य केले. त्यामुळे, हजारो लिटर पाणी वाचवण्यात यश मिळाले.

दरम्यान, पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अस्नोडा पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, बार्देश तालुक्याला दोन दिवसांच्या आत सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

महामार्गाच्या बाजूला पाणीपुरवठा करण्यासाठी घालण्यात येणारी जलवाहिनी महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकक्षेत येत आहे. असे असले तरी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सर्वेक्षण करून दुरुस्तीकामासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

समांतर जलवाहिनीनंतरच प्रश्न सुटेल!
शिवोली, कळंगूट, म्हापसा, पर्वरी तसेच बार्देश तालुक्यात महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या जलवाहिन्यांना पाण्याचा उच्च दाब मिळत नसल्यामुळे त्या भागांत पाण्याची टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे, जुन्या जलवाहिनीला समांतर नवीन जलवाहिनी घातल्यानंतर पर्वरी व अन्य भागांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अस्नोडा येथील पाणी प्रक्रिया प्रकल्पातून संपूर्ण बार्देश तालुक्याला पुरवठा करण्यात येत आहे. अस्नोडा प्रकल्पापासून नवीन जलवाहिनी कार्यान्वित केल्यानंतर विविध ठिकाणी होणारी पाणीटंचाई आटोक्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या