गिरी येथे जलवाहिनी फुटली; शिवोलीत अनेक घरांत पाणी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

दिवसभर संततधार बरसणारा पाऊस येथील जलवाहिनीच्या  दुरुस्तीच्या कामात अडथळा ठरत होता. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

शिवोली: राज्यात गेले तीन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसामुळे बार्देशातील बहुतेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. म्हापसा-गिरी मुख्य रस्त्याजवळील जलवाहिनी तेथील रस्ता बांदकामात व्यस्त असलेल्या अवजड मशीनचा धक्का बसल्याने फुटली. त्यामुळे सुमारे पंधरा ते वीस मीटरपर्यंतचा पाण्याचा फंवांरा उडताना दिसत होता. दिवसभर संततधार बरसणारा पाऊस येथील जलवाहिनीच्या  दुरुस्तीच्या कामात अडथळा ठरत होता. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

बार्देशातील कळंगुट, शिवोली तसेच हळदोणेतील बहुतेक सखल भागात गेले तीन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबून राहिल्याने त्याचा नियमित वाहतुकीवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेकांच्या दुचाक्या हळदोणे, कळंगुट तसेच सडये शिवोलीतील मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यात गेल्याने इंजिनात बिघाड झाल्याने बंद पडल्याचे दिसून आले.

शिवोलीतील दांडा तसेच गुडे आणि भाटीवाडा येथील अनेक घरांत दुथडी भरून वाहत असलेल्या शापोरा नदीचे पाणी घुसल्याने अनेकांची घरगुती सामान आवरताना धांदळ उडाल्याचे दिसून आले. हडफडे येथील पेट्रोलपंप नजीकच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने अनेक दुचाक्या तसेच छोट्या गाड्या अडकून पडल्या होत्या. म्हापशातील वाहतूक विभाग सोमवारी दिवसभर स्थानिक वाहनचालकांना कुठल्याही प्रकारचे तालांव न देता उलट पाण्यात बुडून मशीन बंद अवस्थेत अडकून पडलेल्या वाहनचालकांची मदत करतांना दिसत होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या