गोवा: ''महाराष्ट्राने गोवा 'कोविड संवेदनशील' राज्य कोणत्या आधारावर घोषीत केले''

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 19 एप्रिल 2021

शेजारील महाराष्ट्र राज्याने गोवा हे कोविडचा उगम होणारे  संवेदनशील राज्य असल्याची घोषणा करणे ही चिंतेची बाब आहे.

मडगाव :  शेजारील महाराष्ट्र राज्याने गोवा हे कोविडचा उगम होणारे  संवेदनशील राज्य असल्याची घोषणा करणे ही चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील भाजप सरकारचे हेच यश का असा प्रश्न विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे.  गोवा सरकार गोमंतकीयांपासून काहितरी लपवित आहे का असा प्रश्न दिगंबर कामत यांनी केला  आहे. मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांच्या जीवाशी खेळ न मांडता सत्य लोकांसमोर ठेवावे अशी मागणी  कामत यांनी केली आहे. 

गोवा सरकारने कोविड हाताळणीसाठी तयार केलेला कृती आराखडा आकडेवारीसह जनतेसमोर ठेवावा अशी मी सातत्याने मागणी करीत आलो आहे. आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे याची माहिती लोकांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. सरकार कोविड लसी, प्राणवायु, कोविड औषधे यांच्या उपलब्धतेवर माहिती देण्यास का टाळाटाळ करते हे मुख्यमंत्र्यानी सांगावे असे  कामत यांनी म्हटले आहे. (Goa On what basis did Maharashtra declare Goa a Covid Sensitive State)

गोवा: परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या विध्यार्थांना घेतले ताब्यात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब महाराष्ट्र सरकारकडे हा विषय न्यावा व गोव्याला त्यांनी कोविड उगमाचे  संवदनशील  राज्य म्हणुन कोणत्या आधारे जाहिर केले याची माहिती गोमंतकीयांना द्यावी. सरकारने नुसती सारवासारव करुन चालणार नाही असा इशारा  कामत यांनी दिला आहे.  भाजप सरकारने केंद्र सरकारकडे ही हा विषय गांभीर्याने मांडणे गरजेचे आहे. कोणत्याही राज्याला कोविड संवेदनशील घोषीत करण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष तयार केले आहेत का, त्याची माहिती मुख्यमंत्र्यानी जनतेला द्यावी अशी मागणी त्यांनी केली. 

 शेजारी महाराष्ट्र राज्याने शास्त्रीय  आधार न घेताच ही घोषणा केल्यास त्याचा प्रत्येक गोमंतकीयांने निषेध केला पाहिजे. गोवा सरकारने त्वरित यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे असे कामत यांनी सांगितले. . 

संबंधित बातम्या