गोवा महिला आयोगाककडे येतात दिवसाला ३ ते ४ तक्रारी

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

राज्याच्या महिला आयोगाकडे दिवसाला सरासरी तीन ते चार तक्रारी येत आहेत आणि आम्ही या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

पणजी: राज्याच्या महिला आयोगाकडे दिवसाला सरासरी तीन ते चार तक्रारी येत आहेत आणि आम्ही या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी अनेक महिलांच्या तक्रारी प्रलंबित होत्या. या तक्रारीसुद्धा आम्ही सोडवत आणल्या असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे यांनी दिली. 

टाळेबंदीच्या काळात आयोगाकडे खूप कमी तक्रारींची नोंद झाली होती. मात्र, आता महिला पुढे येत आहेत. ज्या महिला तक्रारी करण्यासाठी येत आहेत, त्यांच्यामध्ये विवाहित महिलांचे प्रमाण जास्त आहे. अविवाहीत तसेच कॉलेजला जाणाऱ्या महिलांच्या याबाबतीत आता महाविद्यालयीन जीवन ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने छेडछाडीच्या तक्रारी खूप कमी प्रमाणात समोर येत असल्याचेसुद्धा यावेळी त्यांनी सांगितले. 

सध्या आयोगाकडे येणाऱ्या प्रत्येक समस्येच्या बाबतीत आम्ही ४ ते ५ वेळा लोकांना भेटत आहोत आणि प्रकरणे सोडवत आहोत. कधीकधी महिलेच्या घरातील वातावरण पाहण्यासाठी आम्हाला भेटसुद्धा द्यावी लागते. सायबर क्राईमच्या तक्रारींच्या बाबतीतसुद्धा ठोस काम करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. 

राज्यातील महिलांबाबतचे आणि कायदे आणि आयोगाची नियमावली मराठी आणि कोंकणीमध्ये महिलांच्या हाती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, यासाठीचे कामसुद्धा सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या