निर्दयी ! तब्बल एक वर्षापासून पोटच्या मुलाला कोंडलं घरात

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

डिचोली शहरातील एका आईने आपल्या अल्पवयीन मुलाला घरातच कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणामुळे शहरात खळबळ माजली आहे.

डिचोली: डिचोली शहरातील एका आईने आपल्या अल्पवयीन मुलाला घरातच कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणामुळे शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणामागचे कारण चिंताजनक तेवढेच वेदनादायी असल्याची माहिती समोर येत आहे. 

कौटुंबिक कारणास्तव आईच्या मनावर आघात झाल्यानेच ''त्या'' दुर्दैवी मुलाची परवड होत होती. अशी माहिती समोर आली आहे. हा मुलगा समाजापासून अलिप्त तर होताच, उलट शिक्षणापासूनही वंचित होता. अशी धक्‍कादायक माहिती मिळाली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच, बाल हक्‍क आणि संरक्षण आयोगाने हालचाल करून सरकारी यंत्रणांच्या सहकार्याने ''त्या'' मुलाची सुटका केली आहे. घरात कोंडून राहिलेल्या ''त्या'' मुलाची ''अपना घर'' मध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर मानसिक संतुलन बिघडलेल्या त्याच्या आईला मनोरुग्ण चिकित्सा केंद्रात दाखल केले आहे. मानसिक संतुलन बिघडलेली ती महिला सुशिक्षित आणि सधन कुटुंबातील आहे. 

शहरातील चर्च परिसरात अस्वच्छतेने भरलेल्या आणि मोडकळीस आलेल्या वडिलोपार्जित घरात एक महिला आपल्या अल्पवयीन मुलासहीत राहत होती. कौटुंबिक कारणातून त्या महिलेच्या मनावर मोठा आघात झाला होता. तिचे मानसिक संतुलन ठिकाणावर नव्हते. अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे ती ज्या घरात राहत होती, त्या घराची व्यवस्थित देखभालही होत नव्हती. ही महिला अधूनमधून बाजारात जात होती. मात्र, तिने आपल्या मुलाला घरातच कोंडून ठेवले होते. ती मुलाला घराबाहेर काढत नव्हती. या प्रकाराबाबत तक्रारीही वाढल्या होत्या. मध्यंतरी या मुलाला शहरातीलच एका शाळेतही पाठवण्यात येवू लागले. 

गोव्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात  520 व्यक्तींना कोरोनाविरोधी लस -

''कोविड'' महामारीमुळे शाळा बंद होण्यापूर्वी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात १९ आणि मार्च महिन्यात ११ दिवस तो शाळेतही गेल्याची माहिती मिळाली आहे.  त्यानंतर शाळा बंद झाल्यापासून काल गुरुवारपर्यंत तो मुलगा घरीच कोंडून होता. हे प्रकरण बाल हक्‍क आयोगापर्यंत गेले होते. याप्रकरणी बाल हक्‍क आयोगाने महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. याप्रकरणी उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली. या बैठकीस बाल हक्‍क आयोगाची अध्यक्ष सुषमा मांद्रेकर (चोडणकर), डिचोली मामलेदार कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून तलाठी अजित गावकर, पोलिस निरीक्षक महेश गडेकर, अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस आदी संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या प्रकरणी संबंधित आईची वैद्यकीय तपासणी करण्याचा तसेच मुलाची अपना घरात रवानगी करण्याचा निर्णय झाला. 

संबंधित बातम्या