मडकईच्या उपसरपंचपदी योगेश गावडे यांची निवड

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

मडकई पंचायतीच्या उपसरपंचपदी गेल्या वेळेला शैलेंद्र पणजीकर यांची निवड झाली होती. त्यावेळेला एक मत ऐनवेळी बाद झाल्याने शैलेंद्र पणजीकर यांचा मार्ग सुकर झाला झाला होता.

मडकई: मडकई पंचायतीच्या उपसरपंचपदासाठी आज (सोमवारी) झालेल्या निवडणुकीत मगो पक्षाचे समर्थक पंच योगेश गावडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत योगेश गावडे यांना पाच पंचांचे समर्थन मिळाल्याने पाच विरूद्ध चार अशी संख्या मडकई पंचायतीत दिसली. 

मडकई पंचायतीच्या उपसरपंचपदी गेल्या वेळेला शैलेंद्र पणजीकर यांची निवड झाली होती. त्यावेळेला एक मत ऐनवेळी बाद झाल्याने शैलेंद्र पणजीकर यांचा मार्ग सुकर झाला झाला होता. तरीपण विरोधकांनी शैलेंद्र पणजीकर यांच्याविरोधात पुन्हा अविश्‍वास ठराव आणला. त्यामुळे मडकई पंचायतीचे उपसरपंच रिक्त झाले होते. 

सकाळी मडकई पंचायतीत फोंडा गटविकास अधिकाऱ्यानी उपसरपंच निवडीसाठी खास बैठक बोलावली होती. नऊ पंचसदस्यीय या पंचायतीत उपसरपंचपदासाठी योगेश गावडे व नीलेश  नाईक यांनी उमेदवारी दाखल केली. यावेळी निवडणूक झाली असता योगेश गावडे यांना पाच तर नीलेश नाईक यांना चार मते पडली, त्यामुळे योगेश गावडे यांची निवड जाहीर करण्यात आली. 

गट विकास कार्यालयाचे रवींद्र नाईक यांनी पंचायत सचिवाच्या सहकार्याने कामकाज हाताळले. योगेश गावडे यांच्या उमेदवारीसाठी पंच लक्ष्मी वळवईकर यांनी नाव सूचवले, तर विशांत नाईक यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून अस्थिर असलेल्या मडकई पंचायतीत आता उपसरपंचपदाच्या निवडीवेळी पाच विरुद्ध चार असे चित्र दिसल्याने पंचायतीत आता मगो समर्थक गट प्रबळ ठरला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या