फोंडा उपनगराध्‍यक्षपदी अमिना नाईक; भाजपला झटका

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

फोंडा पालिकेवर वर्चस्व असलेल्या भाजपला उपनगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत पराभव स्‍वीकारावा लागला.

फोंडा: फोंडा पालिकेवर वर्चस्व असलेल्या भाजपला उपनगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत पराभव स्‍वीकारावा लागला. उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीवेळी नाट्यमय घडामोडीत मगो पक्षाच्या समर्थक अमिना नाईक यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे आनंद नाईक, तर मगो पक्षातर्फे अमिना नाईक यांनी उमेदवारी दाखल केली होती. 

पंधरा सदस्यीय फोंडा पालिकेत भाजपचे बलाबल आठ, तर मगोचे बलाबल सात आहे. त्यामुळे भाजप समर्थक नगरसेवक आनंद नाईक यांची निवड निश्‍चित मानली जात होती, मात्र गुप्त मतदानावेळी भाजप समर्थक नगरसेवकांनी मगो समर्थक नगरसेवकाला मतदान केल्याने अमिना नाईक यांना आठ, तर भाजप उमेदवार आनंद नाईक यांना सात मते पडली. 

भाजपचे बलाबल असूनही बेकार!
फोंडा पालिकेत प्रथमच निवडणुकीनंतर मगो समर्थक प्रदीप नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र प्रदीप नाईक यांच्याविरोधात अविश्‍वास आणून भाजपचे व्यंकटेश नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. ठरल्यानुसार व्यंकटेश नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्षपदी असलेले भाजपचे विश्‍वनाथ दळवी यांची गेल्याच महिन्यात निवड झाली होती. नगराध्यक्षपदी विश्‍वनाथ दळवी यांची निवड झाल्याने उपनगराध्यक्षपद रिक्त झाले होते. दरम्यान, काँग्रेस समर्थक नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक व विलियम आगियार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे बलाबल आठवर पोहोचले होते. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या