मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ‘कोविड’मुक्त झाल्‍यानंतर बैठकांचे सत्र सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री २ सप्टेंबर रोजी कोविडची लागण झाल्याचे चाचणीस सिद्ध झाल्यानंतर शासकीय निवासस्थानी गृह अलगीकरणात होते. ते तंत्रज्ञानाचा वापर करून फाईल्स हातावेगळ्या करणे वा बैठका घेणे आदी कामे करत होते.

पणजी: ‘कोविड’मुक्त झाल्यानंतर आज प्रथमच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयातील आपल्या कार्यालयात पाऊल ठेवले. त्यांनी आज काही बैठकाही घेतल्या. कार्यालयातून निघताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, लोकायुक्तांच्या निवाड्याच्या प्रती मिळाल्या आहेत. त्या अद्याप वाचलेल्या नसल्याने मत व्यक्त करीत नाही.

मुख्यमंत्री २ सप्टेंबर रोजी कोविडची लागण झाल्याचे चाचणीस सिद्ध झाल्यानंतर शासकीय निवासस्थानी गृह अलगीकरणात होते. ते तंत्रज्ञानाचा वापर करून फाईल्स हातावेगळ्या करणे वा बैठका घेणे आदी कामे करत होते. १७ सप्टेंबरपर्यंत आपण कोणालाही भेटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज ते मंत्रालयातील कार्यालयात आले आणि नियमित कामकाज केले.

ते म्हणाले, ज्यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती त्यापैकी काहीजणांना आज भेटलो. ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो आपले काही विषय घेऊन मला भेटले. त्यांनी पर्यटनविषयक काही मागण्या केल्या आहेत. त्याशिवाय वित्त विभागाची मी बैठक घेऊन वेगवेगळ्या खात्यांच्या वित्त विषयक निर्णयांचा आढावा घेतला. आभासी पद्धतीने मी बैठका घेतच होतो. काही फाईल्सवर प्रत्यक्षात सही केल्‍यानंतर त्या हातावेगळ्या करणार आहे.

ऊस उत्‍पादकांबरोबर बैठक
मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, उसाऐवजी पर्यायी पिक घेण्याची योजना शेतकऱ्यांनी सादर केली. सरकारने संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करावा की, आहे तीच व्यवस्था कायम ठेवावी याविषयी निर्णय घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे मी आज जाणून घेतले.

खासगी इस्‍पितळ कोविड शुल्‍क आकारणी फेरविचार
मुख्यमंत्री म्हणाले, खासगी इस्पितळांत कोविड उपचारासाठी समितीने ठरवलेल्या शुल्कांबाबत फेरविचार केला जाणार आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्‍याशी मी बोललो होतो. त्याबाबतची फाईल मागवून घेतली आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. येत्या बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही निर्णय होऊ शकतो.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या