पत्रादेवी नाक्यावर साडेअकरा लाखांची दारु पकडली; अबकारी खात्‍याची कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

अबकारी अधिकाऱ्यांना संशय आल्याने टेंपोची तपासणी केली असता त्यात दारुच्या बाटल्या असल्याचे निदर्शनास आले. त्‍यात रॉयल चॅलेंज व्हिस्की, मॅक्‍डॉल नंबर वन व्हिस्की, व किंगफिशर स्‍ट्राँग बिअरचे बॉक्‍स आहेत.

पेडणे: पत्रादेवी येथील तपासणी रविवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास पेडणे अबकारी कार्यालयाने साडेअकरा लाख रुपयांची बेकायदेशीर दारु पकडली. तसेच टेंपोची किंमत दहा लाख रुपये आहे. अबकारी पोलिसांनी याप्रकरणी साडे एकवीस लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला.

रविवारी पहाटे एम एच ०४ - जे यु २२४३ या क्रमांकाचा टेंपो पत्रादेवी येथील  तपासणी नाक्यावर पोहोचल्यावर अबकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी टेंपो चालकाकडे चौकशी केली. त्‍यावर टेंपोमध्ये बांधकाम साहित्य असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे दाखवली. पण, अबकारी अधिकाऱ्यांना संशय आल्याने टेंपोची तपासणी केली असता त्यात दारुच्या बाटल्या असल्याचे निदर्शनास आले. त्‍यात रॉयल चॅलेंज व्हिस्की, मॅक्‍डॉल नंबर वन व्हिस्की, व किंगफिशर स्‍ट्राँग बिअरचे बॉक्‍स आहेत. अबकारी पोलिस दारुच्‍या साठ्याची तपासणी करताना व्‍यस्‍त असल्‍याची संधी साधून टेंपो चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिस त्‍याचा शोध घेत आहेत.

पेडणे अबकारी कार्यालयाच्या निरीक्षक सुरेखा गोवर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहनदास गोवेकर, हवालदार शांबा परब, गार्ड सिद्धेश हळर्णकर, रेमंड परेरा, सूरज गावडे व स्वप्नेश नाईक यांनी ही कारवाई केली.

संशय आला आणि...
रविवारी पहाटे साडेतीन वाजण्‍याच्‍या सुमारास टेंपोचालक मुंबईच्‍या दिशेने जाण्‍यासाठी निघाला असता पत्रादेवी येथील तपासणी नाक्‍यावर पोलिसांनी टेंपोचालकाला अडवले. कागदपत्रांची तपासणी केली व टेंपोत काय आहे? असे विचारल्‍यावर त्‍याने बांधकाम साहित्‍य असल्‍याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्‍याने टेंपोची तपासणी केली असता दारुचे बॉक्‍स आढळून आले आणि चालकाचा फोलपणा उघड झाला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या