Pratika Marathe : भरतनाट्यम क्षेत्रातला उगवता गोमंतकीय तारा

भरतनाट्यम क्षेत्रात सांगेची सुकन्या प्रतिका दिनेश मराठे ही देखील आपल्या नृत्यकौशल्याने सांगेचे नाव उज्वल्य करणारी कामगिरी करत आहे.
Pratika Marathe | Bharatnatyam Dancer
Pratika Marathe | Bharatnatyam DancerDainik Gomantak

Artist of Goa : गीत क्षेत्रात आपले नाव केलेल्या स्व. मोगुबाई कुर्डीकर व त्यांच्या कन्या किशोरीताई  आमोणकर या सारख्या कलाकारांनी सांगे तालुक्याला अभिमान मिळवून दिलेला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भरतनाट्यम क्षेत्रात सांगेची सुकन्या प्रतिका दिनेश मराठे ही देखील आपल्या नृत्यकौशल्याने सांगेचे नाव उज्वल्य करणारी कामगिरी करत आहे. गेली वीस वर्षे ‘नुपूर डान्स अकादमी’ या संस्थेत सपना नाईक या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ती भरतनाट्यम शिकत आहे. ‘भरतनाट्यम’ची विशारद ही पदवी तिने संपादन केली आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातल्या विविध स्पर्धात यशस्वीपणे सहभागी होत अनेक बक्षिसे तिने मिळवली आहेत.

कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील ‘गुरुदेव अकादमी ऑफ फाईन आर्टस्’  या संस्थेने हल्लीच आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्तरावरच्या भरतनाट्यम स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तिला प्राप्त झाले. भविष्यात भरतनाट्यम क्षेत्रात तिचे नाव उज्ज्वल राहील अशी अपेक्षा बाळगण्यासारखीच तिची ही कामगिरी आहे. प्रतिका भरतनाट्यम क्षेत्रात गेली वीस वर्षे आपली साधना करत आहे. राष्ट्रीय पातळीवरील हे पारितोषिक म्हणजे तिच्या या साधनेचे फळ आहे असे म्हणण्यास हरकत नाही. आपल्या कामगिरीबद्दल बोलताना ती म्हणते, ‘सपना नाईक यांच्यासारखी चांगली गुरु आणि सातत्याने पाठबळ देणारे वडील (दिनेश मराठे) व आई (दिक्षा मराठे)  यांच्यामुळेच मी या क्षेत्रात इथपर्यंत पोहचू शकले.’ 

2009 साली म्हैसूर येथील अखिल भारतीय स्तरावर आयोजित होणाऱ्या याच भरतनाट्यम स्पर्धेत प्रतिकाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पण यंदा आपली कामगिरी उंचावित तिने दुसरा क्रमांक पटकावला.

गोव्यात आयोजित झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत, उद्घाटन सोहळ्याप्रसंगी, आपली कला सादर करण्याची संधी तिला मिळाली होती. 2018 साली, कला अकादमी आयोजित नक्षत्र उत्सवात तिचे भरतनाट्यमचे सादरीकरण रसिकांची उत्फुर्त वाहव्वा मिळवून गेले होते. भरतनाट्यम व्यतिरिक्त प्रतिकाने सेमी क्लासिकल, बॉलिवूड, लोकनृत्य आणी फ्री स्टाईल नृत्यातही विशेष प्राविण्य मिळविले आहे. नृत्य कलेची साधना करत असताना तिने आपल्या शिक्षणाकडेही व्यवस्थित लक्ष पुरवल्रे. तिने विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली आहे. 

 स्वभावाने शांत आणि मनमिळावू असलेल्या  सांगेची ह्या सुकन्येने आपल्या कर्तबगारीने भरतनाट्यममध्ये मिळवलेल्या यशाबद्धल सांगेवासियांना अभिमान वाटातो आहेच. भविष्यात यापेक्षा मोठे यश तिला लाभो अशी अपेक्षाही प्रत्येकाला आहे. 

- मनोदय फडते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com