गोमंतकीय ‘प्रीती’भोजन चर्चेचा महाराष्‍ट्रभर ‘दरवळ’

अवित बगळे
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

देवेंद्र फडणवीस यांच्‍यासह अन्‍य आमदारांच्‍या सदिच्छाभेटीमुळे उंचावल्‍या अनेकांच्‍या भुवया

पणजी

कोविडचा प्रसार, अयोध्येतील भूमिपूजन इथपासून समकालीन राजकारण, भाजपने देशभर जमवलेला जम अशा कोणत्याही विषयांची आज वानवा नव्हती. निमित्त होते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराष्‍ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या प्रीती भोजनाचे. फडणवीस दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावरून आज मुंबईला निघाले होते. जाताना ते अन्य आमदारांसह मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी पोहोचले.
सोबत आलेल्यांसोबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. नंतर पाच दहा मिनिटे दोघांनी स्वतंत्र चर्चाही केली. फडवणीस यांना दुपारी तीन वाजता दाबोळीहून मुंबईला जाणारे विमान होते. दुपारची वेळ होत आली होती. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आता जेवूनच जा, असा आग्रह केला आणि भोजनाचा बेत निश्चित केला. जेवतानाही राजकीय गप्पा रंगल्या. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे सहभागी झाले होते.

चर्चेचे गूढ कायम?
जेवणानंतर सर्वजण दाबोळी विमानतळावर गेले आणि मुंबईला रवानाही झाले. मात्र, फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी एकांतात कोणती चर्चा केली असेल, याविषयीचे कुतुहल त्यानंतर निर्माण झाले होते. त्याविषयी कोणी अवाक्षर न काढल्याने गूढ कायम राहिले.
या भेटीबाबत भाजपचे सिंधुदुर्ग जिल्‍हाध्‍यक्ष राजन तेली यांना विचारले असता ते म्हणाले, पडवे येथील कोविड चाचणी केंद्राच्या उद्‍घाटनासाठी फडणवीस आले होते. गोव्यातून मुंबईला परतताना त्यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. आम्ही सारे त्यांच्यासोबतच होतो. यावेळी प्रामुख्याने कोविड महामारी आटोक्यात आणण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांविषयी प्रामुख्याने चर्चा झाली.
तानावडे म्हणाले, फडणवीस व महाराष्ट्रातील अन्य मंत्री मुंबईला रवाना होण्यासाठी गोव्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना जेवून जा असा आग्रह केला तो त्यांनी मानला. यावेळी अन्य कोणत्याही खास विषयावर चर्चा झाली नाही.

कोण होते त्‍यांच्‍यासोबत?
फडणवीस यांच्यासोबत महाराष्‍ट्राचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रताप लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार भाई गिरकर, आमदार रमेश पाटील, आमदार नीतेश राणे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी होते.

महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत
मुख्यमंत्र्यांनी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व तेथील सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दुपारच्या भोजनाचे आयोजन करताना त्यांना महाराष्ट्रीय पद्धतीचेच जेवण दिले जाईल, याची विशेष काळजी घेतली होती. डाळ, भात, भाजीसोबत वांग्याचे भरते, चपाती, अळंबी, पुरणपोळी असा खास बेत होता.

संबंधित बातम्या