मुंबईहून परतलेल्या गोमंतकीयाचा खोळंबा

Dainik Gomantak
मंगळवार, 19 मे 2020

या एकंदर प्रक्रियेत त्याचे सुमारे सोळा सतरा तास विनाकारण वाया गेले.

म्हापसा

टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत असलेल्या एका मूळ गोमंतकीयाला गोव्यात पुन:प्रवेश करण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या अटींची तसेच सर्व सोपस्कारांची पूर्ती करूनही सुमारे सोळा सतरा तास विनाकारण खोळंबा होण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. यासंदर्भात पत्रादेवी येथील तपासणी नाक्‍यावरील शासकीय अधिकाऱ्यांचा गलथानपणा झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
म्हापसा येथील एक तरुण नोकरीनिमित्त मुंबईत होता व कुटुंबीयांनी केलेल्या आग्रहास्तव तो शासकीय सोपस्कार पूर्ण करून गोव्यात आला. १२ रोजी मुंबईहून दुपारी चार वाजता खास गाडीतून तो पत्रादेवी येथे १३ रोजी पहाटे पावणे तीन वाजता पोहाचला. तिथे विविध सोपस्कार पूर्ण करेपर्यंत पावणे चार वाजले. हे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लगेच म्हापसा येथील स्वत:च्या कुटुंबीयांना त्यासंदर्भात कळवले व स्वत:ला नेण्यासाठी वाहन घेऊन येण्यास त्यांना सांगितले. त्यानंतर तो तरुण कुटुंबीयांनी आणलेल्या गाडीतून म्हापसा येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये "कोविड 19' संदर्भात आवश्‍यक असलेली वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आला.
म्हापसा येथे तपासणी झाल्यानंतर त्या तरुणाला एका पोलिस कर्मचाऱ्यासमवेत म्हापसा रेसिडेन्सीमध्ये क्‍वारान्टाइन करण्यासाठी नेण्यात आले; तथापि, तिथे त्याच्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळातून त्याच्यासमवेत आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांने स्वत:च्या ड्युटीची वेळ संपल्याचे नमूद करून आपल्याला पुन्हा जिल्हा इस्पितळात पोहोचवण्यास सांगितल्याने त्यांना त्या ठिकाणी त्यांना पोहोचवावे लागले.
त्यानंतर त्या तरुणाला दोनापावला येथील केंद्रात नेण्यात आले व तिथेही जागा नसल्याने त्यांना जुनेगोवे येथे जाण्यास सांगण्यात आले; पण, तिथेही जागा भरलेल्या असल्याने फर्मागुडी येथे जावे लागेल, असे त्याला सांगण्यात आले. अशा वेळी तो तरुण वैतागून गेला; कारण; शासनातर्फे त्याच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. मी घरीच क्‍वारान्टाइन होतो असे तेथील कर्मचाऱ्यांना त्या तरुणाने सांगितले. त्यानंतर पुन्हा तो दोनापावला येथे गेला व तेथील अधिकाऱ्यांशी बोलून तिथे १५ रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ॲडमिट झाला. त्यानंतर सायंकाळी पावणे सातच्या सुमारास त्याचा रीपोर्ट नकारात्मक आल्याने त्याला घरी जाऊ देण्यात आले, त्या दिवशी तो म्हापसा येथे स्वत:च्या घरी १३ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पोहोचला. या एकंदर प्रक्रियेत त्याचे सुमारे सोळा सतरा तास विनाकारण वाया गेले.
शासकीय यंत्रणेने असा गलथानपणा करण्याऐवजी अशा व्यक्‍तींसाठी जागेची उपलब्धता नेमकी कुठे आहे, याची पडताळणी पत्रादेवी येथे तपासणी नाक्‍यावरच करून शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची सोय करणे योग्य ठरले असते, असे मत त्या तरुणाच्या वडिलांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्‍त केले. पत्रादेवीतील अधिकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन केले असते तर अशा प्रकारे त्रास झालाच नसता, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले. शासकीय यंत्रणेतील अशा गलथानपणाच्या कारभारामुळे आपल्या मुलाला विनाकारण सर्वत्र हेलपाटे मारावे लागले, असा दावाही त्यांनी केला. सध्या तो तरुण स्वत:च्या घरीच म्हापसा येथे क्‍वारंन्टाइन झालेला आहे

संबंधित बातम्या