कोणालाही ‘व्‍हीआयपी’ सुविधा मिळणार नाही: विश्‍वजित राणे

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले की, गोमेकॉत १४८ या वॉर्डमध्ये येणाऱ्या गंभीर रुग्णांना वैद्यकीय उपचारात विलंब होणार नाही. अ‍ॅनेस्थेसिया तंत्रज्ञांना कोविड वॉर्डमध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा देखरेख करण्यासाठी नियुक्त केले जाईल.

पणजी: ‘कोविड’बाधित सर्वसामान्य रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी खाटा उपलब्ध केल्या जातील, परंतु कसल्याही प्रकारची ‘व्हीआयपी’ सुविधा दिली जाणार नाही, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज सांगितले.

राज्यातील ‘कोविड’च्या रुग्णांवरील उपचारांविषयी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्‍ज्ञ समितीची आरोग्‍यमंत्र्यांनी सायंकाळी बैठक घेतली. राणे म्हणाले की, गोमेकॉत १४८ या वॉर्डमध्ये येणाऱ्या गंभीर रुग्णांना वैद्यकीय उपचारात विलंब होणार नाही. अ‍ॅनेस्थेसिया तंत्रज्ञांना कोविड वॉर्डमध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा देखरेख करण्यासाठी नियुक्त केले जाईल. ते पुढे म्हणाले की, कमी, मध्यम किंवा गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्याबाबत आरोग्य खाते प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) विकसित करणार आहे.

पल्मोनरी मेडिसिन विभागांतर्गत गोमेकॉतील वॉर्ड क्रमांक ११५ मंगळवारपर्यंत तयार होईल, असे सांगून राणे म्हणाले की, कोविड रुग्णालयातील रुग्णांना सोडण्याचा संबंधित नोडल अधिकाऱ्याला अधिकार राहणार आहे. सरकारने गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, मडगाव येथील जिल्हा रुग्णालय आणि ईएसआय रुग्णालय, फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला कोविड उपचाराचे ठिकाण म्हणून सूचित केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या