नाताळासाठी डिचोलीत ख्रिश्चन बांधवांची लगबग सुरू

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

''कोविड'' च्या सावटामुळे हा सण मर्यादित स्वरुपात  साजरा करण्यात येणार आहे. सध्या डिचोलीत नाताळची तयारी सुरु आहे. हिंदू आणि अन्य धर्मातील लोकही नाताळ सणात उत्साहाने सहभागी होत असतात.

डिचोली- डिचोलीत सध्या नाताळ सणाची लगबग सुरु झाली असून,हा सण साजरा करण्यासाठी शहरातील ख्रिश्‍चन बांधव सज्ज झाले आहेत. डिचोलीत ख्रिश्‍चन बांधवांची संख्या कमी असली, तरी नाताळ सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात येतो. यंदा मात्र ''कोविड'' च्या सावटामुळे हा सण मर्यादित स्वरुपात  साजरा करण्यात येणार आहे. सध्या डिचोलीत नाताळची तयारी सुरु आहे. हिंदू आणि अन्य धर्मातील लोकही नाताळ सणात उत्साहाने सहभागी होत असतात.

 नाताळ सणानिमित्त सध्या डिचोलीतील अवरलेडी ऑफ ग्रेस सायबिणीच्या चर्चला रंगाचा नवा साज देण्यात आला आहे. शहरातील ख्रिश्‍चन बांधवांनी घरांची रंगरंगोटीची कामेही जवळपास पूर्ण केली आहेत. गोठा सजावट हे नाताळ सणाचे मुख्य आकर्षण. शहरात गोठा सजावटीची लगबग सुरु आहे. नाताळ सणासाठी लागणारे ख्रिसमस ट्री, तयार गोठे, सांताक्‍लाजचे मुखवटे, रंगबिरेंगी नक्षत्रे आदी साहित्य बाजारात उपलब्ध असून, त्याची खरेदीही सध्या सुरु आहे.  गुरुवारी २४ रोजी सामाजिक अंतराचे पालन करुन येथील अवरलेडी ऑफ ग्रेस सायबिणीच्या चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त प्रार्थनासभा होणार आहे. मध्यरात्री घंटानाद केल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत नाताळ सणाचे उत्साही स्वागत करण्यात येणार आहे.  

देखाव्याला फाटा !

नाताळ सणावेळी दरवर्षी येथील अवरलेडी सायबिणीच्या चर्चसमोरील आवारात येशू जन्मावर आधारीत आकर्षक  देखावा तयार करण्यात येत असे. यंदा मात्र देखावा असणार नाही. यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रेलचेलीवर निर्बंध येणार आहेत. दरवर्षी नाताळ सणाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी परदेशात असलेले डिचोलीतील बहूतेक ख्रिश्‍चन बांधव डिचोलीत परतत असत. यंदा मात्र परदेशात असलेल्या ख्रिश्‍चन बांधवांची उणीव जाणवणार आहे.

संबंधित बातम्या