श्रीलंकेत अडकले गोमंतकीय

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

नौदलाची जलाश्व ही नौका मालदिवहून येतेवेळी दोन्ही वेळा कोलंबोत थांबली होती. त्या नौकेत केवळ तमीळनाडूतील रहिवाशांना प्रवेश देण्यात आल्याने गोमंतकीयांना तेथे राहण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

पणजी

युरोपीन देशातील अडकलेले गोमंतकीय विमानांतून परतू लागले तरी दोन महिने शेजारील श्रीलंकेत अडकलेले १७ गोमंतकीय मात्र येऊ शकलेले नाहीत. श्रीलंकेत अडकलेल्या आपल्या रहिवाशांना आणण्यासाठी केरळ आणि तमीळनाडूने बोटींची व्यवस्था केली मात्र श्रीलंकेत केवळ १७ गोमंतकीय अडकल्याने ते दुर्लक्षित राहिले आहेत.
नौदलाची जलाश्व ही नौका मालदिवहून येतेवेळी दोन्ही वेळा कोलंबोत थांबली होती. त्या नौकेत केवळ तमीळनाडूतील रहिवाशांना प्रवेश देण्यात आल्याने गोमंतकीयांना तेथे राहण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. त्यांची तेथे राहण्याची व जेवणाची सोय त्यांनाच करावी लागत आहे. कोलंबोतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाशी ते संपर्क ठेऊन असले तरी त्यांना तुम्हाला गोव्यात पाठवू या पलिकडे कोणतेही आश्वासन मिळत नाही. २९ रोजी १६९ प्रवाशांना घेऊन एक विमान मुंबईमार्गे ओडिशाला जाणार आहे. त्या विमानात तरी आपल्याला जागा मिळावी यासाठी हे गोमंतकीय प्रयत्न करत आहेत.
या गोमंतकीयांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक आदींकडे दाद मागितली तरी आश्वासनापलीकडे दोन महिन्यात काहीच न झाल्याने कुटुंबिय खचून गेले आहेत. या अडकून असलेल्या गोमंतकीयांत निल ॲंथनी रॉक दा सिल्वा, फ्रांसिस डिसोझा कोलिन पीटर तेरेन्स, अर्णव सिद्धार्थ नाईक, अमितकुमार सुरेश डुबळे, गोरेट्टी मेरी इडालीना पिंटो, नरेश एच. नाईक, ओम अविनाश चोडणकर, प्रवीण नामदेव नाईक, राजेश दशरथ दाभोलकर, रिचर्ड फर्नांडिस, सचिन रेडेकर, सिद्धार्थ नामदेव नाईक,  शर्वाणी सिद्धार्थ नाईक, स्नेहल सिद्धार्थ नाईक, विद्या नागवेकर, विद्याप्रसाद राजाराम हजारे यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने वंदे मातरम मोहिम सुरु करून विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणणे सुरु केले आहे. तरीही श्रीलंकेसारख्या शेजारील राष्ट्रात अडकलेल्यांकडे सरकार कधी लक्ष देणार असा प्रश्न त्यांच्या कुटुबियांना पडू लागला आहे. ट्विटरसारख्या आधुनिक संदेश प्रसार माध्यमाचा वापर करून या कुटुंबियांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला. ईमेल्स पाठवली तरी त्याला सकारात्मक प्रत्युत्तर मिळत नसल्याने सारे हवालदील आणि भयभीत झाले आहेत.

संबंधित बातम्या