तरुण तेजपाल विरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश

तरुण तेजपाल विरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश

म्हापसा, दि. 7 - तीन वर्षांपूर्वी आरोपपत्र सादर करण्यात आलेले तरुण तेजपाल यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी हे आदेश दिले आहेत. 28 सप्टेंबर रोजी आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. आरोपपत्र पूर्वीच्या युक्तीवादावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यावरील निवाडा राखून ठेवण्यात आलेला. सदर प्रकरणाची सुनावणी ‘इन कॅमेरा’ घेण्यात आलेली. न्यायमूर्ती विजया पोळ यांनी हा आदेश दिला. 
खास सरकारी वकील अ‍ॅड. फ्रान्सिस्को तावारीस यांनी या संबंधीची माहिती दिली. तेजपाल यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली लावण्यात आलेल्या कलमाखाली आरोप निश्चित करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. तावारीस म्हणाले या प्रकरणी न्यायालयाने मर्यादा लागू केल्यामुळे विस्तारीतपणे माहिती देणे शक्य नसल्याचे ते पुढे म्हणाले.
न्यायालय या प्रकरणी आरोप निश्चित करतील व पुढील युक्तीवादाला सुरुवात होणार असल्याचे तेजपाल यांचे वकिल अ‍ॅड. प्रमोद कुमार दुबे यांनी सांगितले. यावेळी न्यायालयात अ‍ॅड. राजीव गोम्स, इतर वकिल तसेच तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत उपस्थित होत्या. 
2013 साली एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिलेवर तेजपाल यांनी केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रांच) तेजपाल विरोधात 17 फेब्रुवारी 2014 साली विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. घटना घडल्यानंतर सुमारे 79 दिवसांत तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. 30 नोव्हेंबर 2013 रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com