गोव्याच्या अमितची कप्तानी खेळी विदर्भास 16 धावांनी नमवून स्पर्धेतील तिसरा विजय

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

गोव्याने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात तिसरा विजय साकारला,त्यांनी विदर्भास 16 धावांनी हरविले.

पणजी:  कर्णधार अमित वर्मा याचे नाबाद अर्धशतक, तसेच त्याने स्नेहल कवठणकर याच्यासमेवत केलेली महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी आणि गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर गोव्याने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात तिसरा विजय साकारला. त्यांनी विदर्भास 16 धावांनी हरविले.

गोव्याचा गटसाखळीतील शेवटचा सामना इंदूर (मध्य प्रदेश) येथील एमेराल्ड हाईट्स इंटरनॅशन स्कूल मैदानावर झाला. गोव्याने सलग सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्यानंतर त्यांनी विदर्भाला 8 बाद 140 धावांत रोखले. विदर्भाचा हा ओळीने पाचवा पराभव ठरला, तर गोव्याने पाच लढतीत तीन विजय व दोन पराभव यासह 12 गुणांची कमाई केली.

गोव्याचा डाव 3 बाद 23 असा संकटात असताना अमितने स्नेहलसमवेत तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. स्नेहलने 30 चेंडूंत एक चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. त्याला आदित्य ठाकरेने अक्षय कर्णेवारकरवी झेलबाद केल्यानंतर, अमितने आक्रमक फलंदाजी करत गोव्याला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला. तो 72 धावांवर नाबाद राहिला. त्याने 46 चेंडूंतील खेळीत आठ चौकार व तीन षटकार खेचले. त्याने 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

गोव्याच्या गोलंदाजांनी विदर्भाची 5 बाद 68 अशी बिकट स्थिती केली होती, मात्र अपूर्व वानखेडे व अक्षय कर्णेवार यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी (55) भागीदारी केल्यामुळे गोव्याच्या गोटात चिंता निर्माण झाली. अठराव्या षटकात कर्णेवारला फेलिक्स आलेमावने आदित्य कौशिककरवी झेलबाद केल्यानंतर सामना विदर्भाच्या हातून निसटला.

 

संक्षिप्त धावफलक

गोवा :  20 षटकांत 6 बाद 156 (एकनाथ केरकर 8, आदित्य कौशिक 3, अमोघ देसाई 12, स्नेहल कवठणकर 35- 30 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, अमित वर्मा नाबाद 72- 46 चेंडू, 8 चौकार, 3 षटकार, सुयश प्रभुदेसाई 1, लक्षय गर्ग 7, दर्शन मिसाळ नाबाद 13, दर्शन नळकांडे 4-0-41-1, आदित्य ठाकरे 4-0-18-2, यश ठाकूर 4-0-36-3) वि. वि. विदर्भ : 20 षटकांत 8 बाद 140 (जितेश शर्मा 10, अक्षय वाडकर 21, मोहित राऊत 15, अपूर्व वानखेडे 27, अक्षय कर्णेवार 31, लक्षय गर्ग 4-0-28-2, विजेश प्रभुदेसाई 4-0-21-1, फेलिक्स आलेमाव ४-०-२७-३, दर्शन मिसाळ 4-0-26-1, सुयश प्रभुदेसाई 2-0-11-0, मलिक सिरूर 2-0-21-0)

संबंधित बातम्या