‘सोपो’वादात गोव्याची मासळी महागली!

‘सोपो’वादात गोव्याची मासळी महागली!
masali bajar

पणजी: कोविड काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेकजण नानाविध उपाय करत आहेत. त्यात काढे घेण्यापासून मासे खाण्यापर्यंत ते अंडी खाण्यापासून चिकन खाण्यापर्यंतच्या उपायांचा यात समावेश होतो. मात्र, गेले काही दिवस बाजारात मासे कमी प्रमाणात मिळत असल्याने त्यांचे दर वाढले आहेत. याचा फटका मासे मुख्य अन्न असलेल्यांपासून पौष्टिक खाण्यासाठी मासे खरेदीसाठी मासळी बाजाराची सैर करणाऱ्यांना बसू लागला आहे. या साऱ्याचे मुळ मडगावच्या घाऊक मासळी बाजारात आहे. तेथील बाजार संघटनेने हा विषय अगदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंतही पोहोचवला आहे. दक्षिण गोवा नगर नियोजन प्राधिकरणाने सोपो गोळा करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून सतावणूक केली जात असल्याचा हा मुद्दा असल्याचे सांगण्यात येत आहे.(Goa's fish became more expensive in the 'Sopo' controversy)

सोपो करात करण्यात आलेली वाढ आणि त्याचा परिणाम म्हणून मासळी बाजारात मासळी आणणे व्यापाऱ्यांनी बंद केल्याने ही मासळीची टंचाई निर्माण झाली आहे. गेले 18 महिने या कंत्राटदाराचे काम सुरू असून त्याच्या नियुक्तीसाठी निविदा मागवण्याची प्रक्रियाही पार पाडली गेली नसल्याकडे आता मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. मडगावातील हा घाऊक मासळी बाजार तात्पुरत्या स्वरुपात का होईना, बंद पडल्याने राज्यभरातील मासळीची उपलब्धता घटली तर आहेच याशिवाय मासेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणे सुरू झाले आहे.

काय म्‍हटले निवेदनात?
याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजारात वाहनांचा प्रवेश देण्यासाठी रांग पद्धत पाळली जात नाही. आपल्या मर्जीनुसार कंत्राटदाराकडून वाहनांना प्रवेश दिला जातो. पूर्वी एका वाहनामागे तासाला 300 रुपये आकारले जायचे आता त्यात अचानकपणे तासाला पाचशे रुपये आकारणे सुरू करण्यात आले आहे. या शुल्काची पावती मागितल्यास वाहनांना सरळपणे प्रवेश नाकारण्यात येतो. बाजारात खासगी सुरक्षा रक्षकांची (बाऊंसर्स) दादागिरी चालते. मडगाव घाऊक मासळी मार्केट संघटनेचे सरचिटणीस ज्योकीम बोर्जीस यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले असून त्याची प्रत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाही सादर केली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com