डिचोलीत कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; एका अधिकाऱ्यासह तालुक्यात तिघांचे बळी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे तिघांचे बळी गेले असले तरी कालपासून डिचोली तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बरीच घटल्याचे दिसून आले आहे. आज सोमवारी तालुक्यात केवळ १८ सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.

डिचोली: डिचोली तालुक्यात कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढला असून आज सोमवारी कोरोनामुळे तालुक्यात एका अधिकाऱ्यासह तिघांचे बळी गेले आहेत. एका खासगी कंपनीत मनुष्यबळ विभागात अधिकारी असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीसह डिचोलीतील ७१ वर्षीय निवृत्त शिक्षक आणि पाळी येथील एक ज्येष्ठ व्यक्ती मिळून तिघांना कोरोना संसर्गामुळे मृत्यू आला आहे. आरोग्य खात्याच्या बुलेटिननुसार ही माहिती मिळाली आहे. 

कोरोनामुळे तिघांचे बळी गेले असले तरी कालपासून डिचोली तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बरीच घटल्याचे दिसून आले आहे. आज सोमवारी तालुक्यात केवळ १८ सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. डिचोली विभागात १२ मये विभागात ५, तर साखळी विभागात केवळ एकच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे, अशी माहिती मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. 

रविवारी डिचोली विभागात १६३, मये विभागात १३५ आणि साखळी विभागात १९२ मिळून तालुक्यात एकूण ४९० कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज डिचोलीत २१, मयेत १४ आणि साखळीत १५ मिळून तालुक्यात ५० रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्यातील ५१ रुग्ण कोविड सुविधा केंद्रात उपचार घेत आहेत, तर डिचोलीत - १३७, मयेत - १२० आणि साखळीत - १६४ मिळून ४९० रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील १८ रुग्णांवर उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या