काल म्हापसाच्या आठवडी बाजारात कोरोना दबून मेला; पहा फोटो

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

बार्देश तालुक्यात हल्लीच्या काही दिवसांत कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली असतानाही त्याचा कोणताही परिणाम म्हापसा बाजारपेठेवर झालेला नाही.

म्हापसा: ‘कोविड-19’ संदर्भात सर्वतोपरी खबरदारी लोकांनी घ्यावी अशी सूचना शासकीय पातळीवरून केली असताना तसेच बार्देश तालुक्यात हल्लीच्या काही दिवसांत कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली असतानाही त्याचा कोणताही परिणाम म्हापसा बाजारपेठेवर झालेला नाही. काल शुक्रवारी झालेल्या आवड्याच्या बाजारात तर ग्राहकांची नेहमीपेक्षाही जास्त वर्दळ असल्याचे दिसून आले.

काल शुक्रवारी म्हापसा पालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होते व त्यामुळे  शुक्रवारच्या आठवड्याच्या बाजारावर मतदानामुळे परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तथापि, ग्राहकांची संख्या कमी होण्याऐवजी ती अधिकच वाढली. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून या आठवड्याच्या बाजाराला गर्दी होती. परंतु, त्या गर्दीने काल शुक्रवारी गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक गाठला, असे मत काही दुकानदारांनी व्यक्त केले. बाजारपेठेतील सर्व दुकाने खुली होती. शिवाय, नेहमीप्रमाणे अन्य विक्रेतेही बाजारपेठेत होते. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्‍भवला. दुपारच्या वेळेस अर्थात दीड ते साडेतीनच्या सुमारास ही गर्दी थोडीफार कमी होती. तथापि, सकाळच्या सत्रात आणि सायंकाळच्या सत्रात लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी आले होते.

गोव्यात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा असतांना कोरोना रुग्णांचा मृत्यू? 

कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारकडून टाळेबंदी जारी होण्याची शक्यता गृहीत धरून त्या भीतीपोटी काही लोकांनी आगामी एक-दोन महिन्यांसाठी तसेच पावसाळ्यासाठीही अन्नधान्याची बेगमी करण्यास आतापासूनच सुरुवात केली. काहींनी तर घाऊक पद्धतीने तांदळाच्या पोत्यांची खरेदीही केली. काहींनी तर पावसाळ्याची पूर्ण बेगमी आत्ताच केली आहे. त्याबाबत सुक्या लाल मिरचीला जास्त मागणी होती. परंतु, बाजारपेठेत अजूनही मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक झालेली नसल्याने व सध्याचे अवाढव्य दर लक्षात घेऊन काहींनी त्यासंदर्भातील खरेदी करण्याचे टाळले.

Happy Birthday: वाढदिनी गोव्याचे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत अनुपलब्‍ध 

मे महिन्यात एकंदर परिस्थितिनुरूप यदाकदाचित टाळेबंदी जारी झाली तर खरेदी करण्याबाबत गोची होऊ नये असा विचार कित्येकांनी केला. संभाव्य टाळेबंदीमुळे बाजारपेठेच बंद ठेवली जाऊ शकते व त्यामुळे मिरच्या, आमसुले, सुके मासे इत्यादी सामग्री आताच खरेदी केलेली बरी, अशी ग्राहकवर्गाची मनोधारणा आहे.

गोव्यातील अंमलीपदार्थविरोधी पथकाने पाळत ठेवून केला 7 लाखांचा ड्रग्ज जप्त 

दरम्यान, म्हापसा बाजारपेठेत खरेदी-विक्रीबाबत व्यवहार करताना काही विक्रेते, दुकानदार व ग्राहक कोविडविषयक नियमांचे पालन करीत नाहीत असे आढळून आले. पोलिस कर्मचारी अन्य रस्त्यांवर उभे राहून मास्क न परिधान करणाऱ्यांकडून दंड वसूल करीत आहेत; तथापि, बाजारपेठेत अशी दंडात्मक कारवाई करताना पोलिस कर्मचारी दिसलेच नाहीत.

संबंधित बातम्या