गोयेंकरांनो सरकारी कामासाठी लॉकडाऊन नंतर या

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के केली, तरी अनेकजणांना झालेल्या कोरोना संसर्गामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.

पणजी : सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के केली, तरी अनेकजणांना झालेल्या कोरोना संसर्गामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. जिल्हाधिकारी, वाहतूक, पोलिस, पणजी महापालिका तसेच इतर खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली आहे. दैनंदिन वाढणाऱ्या संसर्गामुळे सरकारी अधिकारी भेटत नाही. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरूनच लोकांना परत जावे लागत आहे अशी स्थिती आहे. (Goenkars, come after the lockdown for government work)

लॉकडाऊन नंतर या...
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची विविध कामे असतात. या कार्यालयात मामलेदार व नागरी पुरवठा खात्याचा विभाग आहे. वाहतूक खात्यात लोकांची विविध परवान्यासाठी नेहमीच गर्दी असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरेमुळे कामकाज संथगतीने सुरू आहे, त्याचा परिणाम अनेकांना रांगेत उभे राहूनही वेळ संपल्याने दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागत आहे. सरकारी खात्याच्या प्रवेशद्वारावर दोरी बांधून प्रवेश बंद केला आहे. महत्त्‍वाची कामे असल्यासच प्रवेशद्वारावरील कर्मचारी ती संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहचवतो. मात्र अत्यावश्‍यक नसलेली कामे घेऊन लॉकडाऊन नंतर या, असे लोकांना सांगून परत पाठविले जाते. एखाद्या नागरिकाला त्याचे काम हे महत्त्वाचे असते ते या खात्याच्या कर्मचाऱ्याला महत्त्‍वाचे वाटत नाही. 

Goa Lockdown: पर्यटकाचे बाहेर जाण्याचे मार्ग बंद; हॉटेलमध्येच करावा लागणार...

प्रत्‍येकाच्‍या मनात धास्‍ती
पोलिस खात्यातील प्रशासकीय विभागात असलेली जागा अपुरी आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे मात्र तेथील जागा आहे तेवढीच आहे. त्यामुळे या कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांना दाटीवाटीने खुर्च्या घालून बसण्याची पाळी येत आहे. या विभागातील काही कर्मचारी कोरोना संक्रमणित झाले आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे का? याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली, तरी कोरोना बाधित कर्मचारीही येत नसल्याने दैनंदिन कामाचा ताण वाढला आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीच सोयरसुतक नाही. मात्र हेच अधिकारी स्वतः मात्र कोरोना संसर्ग होऊ नये याची पूर्ण काळजी घेत आहेत. 

मनपा कर्मचाऱ्यांनाही संसर्ग
वाहतूक खात्यातही विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या नेहमी लांब रांगा लागत आहेत. सकाळी या कार्यालयात गेलेली व्यक्तीला काम पूर्ण होईपर्यंत किमान दोन तास लागतात. त्यामुळे लोकांना सरकारी कार्यालयातील कामासाठी स्वतःच्या कामावर दांडी मारावी लागत आहे. पणजी महापालिकेतील अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने कामावर परिणाम झाला आहे. स्वच्छता निरीक्षक तसेच सफाई कामगार त्याला बळी पडले आहेत. पणजी शहरातील कचरा उचलण्याच्या तसेच मान्सूनपूर्व सुरू झालेल्या गटार साफसफाई कामातही संथपणा आला आहे. काही कंत्राटी कामगार घेण्याबाबत महापालिका प्रशासन विचारात आहे. पोलिस स्थानकात कर्मचारी हे कोरोना वॉरियर्स आहेत मात्र अनेकजण कोरोना संसर्ग झाले आहेत. काहींनी लस घेतल्याने घरी राहत आहेत. त्यामुळे पोलिस स्थानकात जाणाऱ्या लोकांना कामांसाठी वारंवार हेलपाटे मारण्याची पाळी येत आहे.

पणजी डॉक्टरांचा इशारा; तर..  कोरोनाबाधितांची सेवा खंडित करू

संबंधित बातम्या