दाबोळीत साडे पंधरा लाखांचे सोने जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या टाळेबंदीत शिथिलता आणल्‍यानंतर गोवा सरकारने विमान वाहतूक सुरू केली. त्‍यानंतर कस्‍टमने सोमवारी प्रथमच दाबोळी विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश केला.

मुरगाव, दाबोळी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या टाळेबंदीत शिथिलता आणल्‍यानंतर गोवा सरकारने विमान वाहतूक सुरू केली. त्‍यानंतर कस्‍टमने सोमवारी प्रथमच दाबोळी विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश केला. सुमारे साडे पंधरा लाख रुपये किंमतीचे सोने कस्टमने पकडले.

दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या ६ ई -८४४५ या विमानातून आलेल्या प्रवाशाने आसनाखाली लपवून ठेवलेले ३४५ ग्रॅम वजनाचे सुमारे साडे पंधरा लाख रुपये किंमतीचे सोने हस्तगत केले. दुबईतून आलेल्या विमानातून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केली जाते. याची जाणीव कस्टमच्या दाबोळी विमानतळावरील दक्षता विभागाला होती. त्यामुळे कस्टमचे सहाय्‍यक आयुक्त वाय. बी. सहारे यांनी दुबईतून आलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानावर पाळत ठेवली होती. सर्व प्रवाशांची झडती घेतल्यानंतरही काहीच सापडले नव्हते. तरीही, श्री. सहारे यांनी आपल्याला मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन विमानाची झडती सुरू केली तेव्हा एका आसनाच्या खाली दडवून ठेवलेली तीन सोन्याची बिस्‍किटे त्यांना 
सापडली. 

विमानातील आसनाखाली लपवून ठेवलेले सोने एखाद्या विमान कामगाराच्या सहाय्याने प्राप्त करून घ्यावे, अशी योजना तस्कराची होती. पण, तत्पूर्वीच श्री. सहारे आणि त्यांच्या साथीदारांनी आसनाखाली दडवून ठेवलेले सोने जप्त केले.
 

संबंधित बातम्या