गोव्याच्या ‘सुजलाम सुफलाम’ भूमीत कोळसारुपी राक्षस नको

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

‘सुजलाम सुफलाम’ अशा या भूमीत कोळशाच्या महाराक्षसास वाट मोकळी करून देण्यासाठी रेल्वे दुपदरीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे.

शिवोली: गोव्याच्या नैसर्गिक संपदेला हानी पोहोचविणारे प्रकल्प गोमंतकीयांना कुठल्याही परिस्थितीत येथे नको आहेत. ‘सुजलाम सुफलाम’ अशा या भूमीत कोळशाच्या महाराक्षसास वाट मोकळी करून देण्यासाठी रेल्वे दुपदरीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे. यामुळे भावी पीढीचे भविष्य संपविण्याचा डाव सरकारकडून आखण्यात येत आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुण गोमंतक भूमी तसेच येथील निसर्गाच्या रक्षणासाठी  रस्त्यावर उतरलेले आहेत, सरकारचा हा कुटील डाव नेस्तनाबूत केल्याशिवाय जनता आता गप्प बसणार नाही, असा इशारा ‘गोंयचो एकवोट’चे कॅप्टन विरियातो यांनी दिला.

राज्यात होऊ घातलेल्या कोळसा प्रकल्प तसेच रेल्वे दुपदरीकरणास विरोध दर्शविण्यासाठी शिवोली येथील चर्च मैदानात आयोजित जाहीर सभेत मार्गदर्शन करताना कॅप्टन विरियातो बोलत होते. यावेळी शिवोली पंचक्रोशीतील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने मैदानात उपस्थित होते. दरम्यान, येथील सभेच्या सुरवातीला शिवोलीतील थिएटर जंक्शन परिसरात तरुणांच्या समुहाकडून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश देणारी अनेक पथनाट्ये सादर करण्यात आली. कर्नाटकातील कोळसा प्रकल्पांना विदेशातून मोठ्या प्रमाणात येणारा कोळसा रेल्वेमार्गे त्यांना सुरक्षित पुरविण्यासाठीच गोव्यात रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचा घाट घालण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. 
सध्या गोव्याच्या महसुलाचा आर्थिक कणा असलेल्या पर्यटनाचाही या कोळसा प्रकल्पांमुळे ऱ्हास होणार असल्याची भीती कॅप्टन विरियातो यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सुत्रे हाती घेताच अनेक राष्ट्रीय कंपन्यांचे वाटोळे झाले. अंबानीसाठी ‘बीएसएनएल’ही तर अदाणीसाठी इंडियन एअरलाईन्स संपवली. असा आरोप विरियातो यांनी केला. 
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कारकिर्दीत राज्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. सध्या या नद्यांची नावे सुद्धा बदलून त्यांना आकडेवारीचे क्रमांक देण्यात आल्याचे त्यांनी उदाहरणादाखल स्पष्ट करून सांगितले. शिवोलीतील शापोरा नदीची ओळख आता भावी पिढीला केवळ एक ठराविक आकडा वाचून करून देण्यात येणार असल्याची माहिती विरियातो यांनी दिली.

संबंधित बातम्या