गोमंतकीयांनी जोपासली घुमट आरतीची परंपरा

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

समाज बांधवांना शेकडो वर्षांपासून एकत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरलेला उपक्रम

पर्वरी:  कोकणचा प्रदेश मुंबईपासून गोव्यापर्यंत एका सुत्रात संस्कृतीत आणि परंपरेत घट्ट गुंतलेला आहे.  दर दहा कोसांवर जसे बोलीभाषेच्या उच्चारणामध्ये, ढंगामध्ये आणि अपभ्रंशीत शब्दांमध्ये बदल होतात तसेच थोड्याफार फरकाने महाराष्ट्रातील कोकण पट्टा आणि गोवा याबद्दल सांगता येईल.

गोमंतकाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती जतनासाठी, संवर्धनासाठी तसेच परावर्तीत करण्यासाठी गोमंतकीयांनी घेतलेले अपार कष्ट.  पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जाचक राजवटीतसुद्धा घुमट वादन, घुमट आरती हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम गोमंतकीयांनी सांभाळला हेच संस्कृती जतनाचे, धैर्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे  उदाहरण म्हणावे लागेल.  पुढील पिढीला सुपूर्द करताना सामाजिक समरसता जपण्यासाठी गोमंतकीयांच्या विजुगिषु वृत्तीला वाखाणलेच पाहिजे. गोमंतकातील घुमट आरती हा सामाजिक समरसता जोपासणारा उपक्रम समाज बांधवांना शेकडो वर्षांपासून एकत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरला आहे.  

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन घुमट वाजवत (घुमट वादन) विशिष्ट चालीत आरती म्हणणे हा गोमंतकीय लोकांचा अभिमानास्पद विषय आहे.  कित्येक शतकांपासून चालत आलेल्या तसेच गोमंतक स्वातंत्र्यपूर्व काळात पोर्तुगीजांच्या छळाला न जुमानता सातत्याने  घुमट आरती वादन उपक्रमातून गावातील लोक एकमेकांच्या घरी जातात.  एकमेकांशी संवाद साधतात, सुखदुःखांचे आदानप्रदान होते तसेच सामुहिक आरती वादनामुळे अनाकलनीय उर्जेचा संचार पुढील वर्षभरासाठी अदृश्य शक्ती देऊन जातो.

गावात घुमट आरती म्हणणारे, घुमट वाजवणारे तरुणांचे गट दररोज वेगवेगळ्या वाड्यावर जाऊन, घरोघरी जाऊन आरती म्हणतात,  आनंद देतात, आनंद लुटतात.   कित्येक शतकांची ही परंपरा पुढील पीढीस देण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसतात.  तरुणांसाठी घुमट आरती वादन शिकवणारे वर्ग गणेशोत्सव मंडळांचा उपक्रमच आहे.  महाष्ट्रात शिमगोत्सवाच्या निमित्ताने वर्षभरातील हेवेदावे, भांडणतंटे दूर होण्यासाठी विशिष्ट पद्धतीने होळीचा सण साजरा होतो तद्वतच गोमंतकातील गणेशोत्सव गावातील हेवेदावे, भांडणतंटे दूर होण्यासाठी मदतगार ठरतो.  

गणेशोत्सवातील सामाजिक उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव ईत्यादींचा उल्लेख करत असताना घुमट आरती चे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन गोमंतकीय लोकांनी सामाजिक समरसता जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नामध्ये अग्रक्रम लागतो.  गोमंतकाची घुमट आरती ऐकताना त्याची चाल, उच्चारण आणि नाद व्यक्तीला तल्लीनतेची अनुभूती देऊन जातो.   या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे जतन करण्यासाठी आजही तितक्याच उत्साहाने प्रयत्न होताना दिसतात.  
या उपक्रमात उच्च-नीच, ज्येष्ठ-कनिष्ठ, लहान-थोर असा कोणताही भेदभाव ठेवला जात नाही तसेच कोणत्याही अतिरेकी अवगुणांचा स्पर्श घुमट आरती या कलेला आजपर्यंत झालेला नाही हे विशेषत्वाने जाणवते.   पुर्वीच्या काळी एखादी कला जोपासली जावी म्हणून राजाश्रय मिळत असे त्याचप्रमाणे घुमट आरती चे जतन व संवर्धन शासकीय संमतीने होते हे उल्लेखनीय.   सर्वधर्मसमभाव च्या खुळ्या कल्पनेत, आभासी जगात न राहता स्थानिक संस्कृतीचे जतन करणे, (ज्यामधून सामाजिक समरसता जपण्यासाठी मदत होते) याला प्राधान्य दिले जाते हे गोमंतकीय सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक समरसतेचे द्योतकच म्हणावे लागेल. 

यावर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे वाड्यावरील लोक कमी येतात अन्यथा १००-१५० लोकांच्या एकत्रीकरणाने घुमट आरती केली जाते.  हा गणेश आरतीचा कार्यक्रम तास दोन तास चालतो.  पुरोगामित्वाचा खुळचट बुरखा पांघरून आपले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सोडून देणाऱ्यांपैकी गोमंतकीय नव्हेत. हे पुरोगामित्वाचे लक्षण कदाचित मानले जाणार नाही, पण गोमंतकीयांना दुसरे काय म्हणतात याच्याशी देणेघेणे नसते. कारण संस्कृती रक्षण व संवर्धन हाच मुख्य उद्देश गणेशोत्सवाच्या साजरीकरणातून प्रगट होतो हे गोमंतकाचे वैशिष्ट्य आहे.

संबंधित बातम्या