गोमंतकीय दिवाळीच्या उत्सवाला आगळावेगळा "टच''

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

दिवाळी सणाच्या दीपोत्सवातून येणारा काळ हा उज्ज्वल भवितव्याचा आणि चांगल्या विचारांचा येवो, अशा शुभेच्छा देताना गोमंतकीयांनी चांगले ते देण्याचा अन्‌ घेण्याचा मनाशी दृढ निश्‍चय करावा,

फोंडा: दिवाळी सणाच्या दीपोत्सवातून येणारा काळ हा उज्ज्वल भवितव्याचा आणि चांगल्या विचारांचा येवो, अशा शुभेच्छा देताना गोमंतकीयांनी चांगले ते देण्याचा अन्‌ घेण्याचा मनाशी दृढ निश्‍चय करावा, आणि कोरोनाची महामारी रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बांदोडा ग्रामपंचायत, मगो कार्यकर्ते तसेच माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आज (गुरुवारी) संध्याकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार सुदिन ढवळीकर यांच्यासह ढवळीकर ट्रस्टचे मिथिल ढवळीकर, बांदोडा सरपंच राजेश नाईक, कवळे सरपंच राजेश कवळेकर, वाडी तळावली सरपंच दिलेश गावकर, दुर्भाट सरपंच सरोज नाईक तसेच मडकई, कुंडई आदी पंचायतींचे पंच, मगो पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

कोरोनाची महामारी आणि माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मोहन ढवळीकर यांच्या निधनानिमित्त यंदा हा दीपोत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात आला. पणत्यांच्या सुरेख आराशीने बांदोडकर मैदान खुलून निघाले होते. विशेष म्हणजे गोमंतकीय दिवाळीचा आगळावेगळा "टच'' या उत्सवाला देण्यात आला होता, त्यात लक्ष्मी पूजन, गो पूजन, धेंडलो मिरवणूक व पारंपरिक पोहे प्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी सुदिन ढवळीकर यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना कोरोनाची महामारी रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्यासंबंधी आवाहन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. बांदोडा सरपंच राजेश नाईक यांनी स्वागत केले.

संबंधित बातम्या