भारताीय संविधान स्थापनादिनी गोमंतकीय साहित्यिक आणि दलित समाजातील अग्रणी नेत्याचे निधन

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिक आणि दलित समाजातील अग्रणी नेते दादू मांद्रेकर यांचे आज (ता. २६) भारताच्या संविधान स्थापनादिनी योगायोगाने हृदयविकाराने निधन झाले

मोरजी :  ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिक आणि दलित समाजातील अग्रणी नेते दादू मांद्रेकर यांचे आज (ता. २६) भारताच्या संविधान स्थापनादिनी योगायोगाने हृदयविकाराने निधन झाले. ते आजीवन भारताच्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार करत राहिले. मांद्रे येथे स्थानिक दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुद्धाची प्रार्थना करून करण्यात आले. 
अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, सुभाष केरकर (साहित्यिक), सरपंच, पंच, दलित बांधव, पत्रकार यांचा त्यात समावेश होता.

माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बोलकी प्रतिक्रिया देताना दादू मांद्रेकर हे छोटेखानी घरात राहून त्यांनी मोठे काम केले. तत्त्वनिष्ठ व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने साहित्यात आणि दलित समाजात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिशांती मिळू दे अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. 

माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप म्हणाले, की मांद्रे गावचे ज्येष्ठ नागरिक, आंबेडकरी चळवळीतले खंदे कार्यकर्ते, साहित्यिक, फोटोग्राफर, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक पैलूंमुळे समाजमान्य झालेले आमचे मित्र दादू मांद्रेकर यांच्या निधनाबद्दल दुःख होत आहे. त्यांच्या आत्म्यास निर्वाणगती लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली.

प्रा. विठोबा बगळी म्हणाले, दादू यांना अखेरचा दंडवत. तुमच्या संविधानिक कार्याला आमचा सलाम. संविधानाच्या अमलबजावणीचा आग्रह धरणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य संविधान पुरस्कर्त्याला राष्ट्रीय संविधानदिनी मृत्यू येणे म्हणजे एक योगायोग नव्हे, तर तो आपला सन्मान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील समता बंधुता समाजात पसरवणे हीच खरी आपल्याला वाहिलेली श्रद्धांजली असेल. आपल्या अचानक जाण्याने संविधानच जणू पोरकं झालं आहे असे वाटते.

मुख्यमंत्र्यांकडून  दुःख व्यक्त
दादू मांद्रेकर यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान चिरस्मरणीय आहे. ते नेहमीच समाजाच्या भल्यासाठी वावरले. त्यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दादू मांद्रेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

 

संबंधित बातम्या