गोमंतकीय चित्रकार पद्मश्री लक्ष्मण पै कालवश

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोमंतकीय चित्रकार व गोवा कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पद्मभूषण, पद्मश्री लक्ष्मण पै यांचे रविवारी (14मार्च) 8 वाजून 10 मिनिटांनी दोनपावल येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

फातोर्डा: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोमंतकीय चित्रकार व गोवा कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पद्मभूषण, पद्मश्री लक्ष्मण पै यांचे रविवारी (14मार्च) 8 वाजून 10 मिनिटांनी दोनपावल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 95 होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

पद्मभूषण, पद्मश्री या राष्ट्रीय उच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच ललित कला अकादमीचा पुरस्कार त्यांना तीनवेळा लाभला होता. नेहरु पुरस्कार, गोवा राज्य पुरस्कार मायो मेडल, गोमंत विभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले होते. गोकर्ण पर्तगाळ मठाचे पिठाधीश श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामीजींनी त्यांना विद्याधिराज पुरस्कार जाहीर केला होता. मात्र, कोविड महामारीमुळे त्यांना तो प्रदान करण्यात आला नव्हता.

हसत हसत मृत्‍यूला सामोरे गेले! लक्ष्मण पै यांच्या चाहत्या तथा प्रसिद्ध पेंटिंग कलेक्टर श्रीमती शाहिस्था थापा यांनी, त्यांना 2016पासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोव्यात पुन्हा स्थायिक झाल्यावर आपल्याकडे दोनापावल येथे ठेवून घेतले होते व त्या पै यांची आपुकीने काळजी घेत होत्या. श्रीमती थापा यांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी दहा मिनिटे आधी ते चांगले बोलले आणि हसत हसत झोपायला गेले आणि अवघ्या मिनिटांत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पुत्र आकाश, सून, दोन नातवंडे आहेत. त्यांचा मुलगा बाहेर गावाहून गोव्यात परतल्यावर त्याच्या निर्णयानुसार बुधवारी बहुतेक त्यांच्यावर अत्यसंकार होतील असे श्रीमती थापा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या