अस्सल गोमंतकीय स्टार्ट-अप आयुरब्लेझला एनआयटीआय ने दिले प्रोत्साहन

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

गोमंतकीय वातावरण आणि येथे असणाऱ्या सौंदर्याशी निगडित आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधनांची गरज लक्षात घेऊन अस्सल गोमंतकीय स्टार्ट-अप आयुरब्लेझची सुरवात करण्यात आली आहे.

पणजी: जगात कोरोनाचा शिरकाव झाल्यांनतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत.  प्रत्येकाच्या आयुष्यातील आयुर्वेदाचे महत्व यामुळे अधिकच वाढले आहे. गोमंतकीय वातावरण आणि येथे असणाऱ्या सौंदर्याशी निगडित आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधनांची गरज लक्षात घेऊन अस्सल गोमंतकीय स्टार्ट-अप आयुरब्लेझची सुरवात करण्यात आली आहे. अविनाश सिंघ परमार आणि केदार जिरगे यांनी सुरु केलेल्या या १०० टक्के आयुर्वेदिक उत्पादनांना लोकांकरवी चांगल्या पद्धतीने पसंतसुद्धा केले जात आहे. 

आयुरब्लेझच्या आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये तुलसी ड्रॉप्स, इम्युनीब्लेझ रस, आयुरमेह रस, आमला रस यासारख्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या उत्पादनांचासुद्धा समावेश आहे. तसेच आयुर्वेदिक सॅनिटायझर, शॅम्पो आणि कफ सिरपचासुद्धा या उत्पादनांमध्ये समावेश आहे. 

कोरोनाच्या आगमनामुळे अनेक गोष्टी बदलल्या. लोकांना खऱ्या अर्थाने आयुर्वेदीय जीवनप्रणालीचे महत्व समजू लागले. गोव्यातील वातावरणाचा, येथील जीवनप्रणालीचा आणि येथे तसेच भारतभरात असणाऱ्या औषधी वनस्पतींचा वापर करीत पूर्णपणे आयुर्वेदिक उत्पादने आम्ही तयार केली. यासाठी आम्हाला खूप संशोधन करावे लागले. सध्या आम्ही आठ प्रकारची आयुर्वेदिक उत्पादने लोकांच्या सेवेसाठी दिली आहेत आणि भविष्यात या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करण्याची आमची इच्छा असल्याचे स्टार्ट-अपचे संस्थापक अविनाश म्हणाले. 

कोरोनामुळे आपल्याला रोगप्रतिकारकशक्तीचे आणि निरोगी आयुष्याबाबतचे महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी आणि मन स्वस्थ राहण्यासाठीसुद्धा आयुर्वेदिक उत्पादने मदत करत असल्याचे केदार यांनी सांगितले. 

आयुर ब्लेझची उत्पादने १०० टक्के शाकाहारी आहेत आणि यांची निर्मिती पूर्णपणे आयुर्वेदीय प्रणाली वापरून करण्यात आली आहे. सध्या हि उत्पादने गोवाभरात चांगलीच विकली जात आहेत. २०२५ पर्यंत आम्ही भारतभरात हि उत्पादने पोहचविणार असल्याचे  केदार आणि अविनाश यांनी सांगितले. 

नीती आयोगाने केले प्रमोशन 
गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अटल इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून आयुर्ब्लेझला केंद्र सरकारच्या एनआयटीआय आयोगाने प्रोत्साहन दिले आहे. देशात नवीन व्यवसाय निर्मिती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या