गोव्याची सांस्कृतिक परंपरा: भजन सादरीकरणातील पारंपरिक क्रमवारी

गोव्याची सांस्कृतिक परंपरा: भजन सादरीकरणातील पारंपरिक क्रमवारी
गोव्याची सांस्कृतिक परंपरा: भजन सादरीकरणातील पारंपरिक क्रमवारी

गोमंतकीय पारंपरिक भजनाच्या सादरीकरणासंदर्भात काही रूढ संकेत आहेत. ते सर्व नियम कलाकारांनी पाळणे बंधनकारक आहे. सादरीकरणाबाबत स्वैराचार माजवण्याचे स्वातंत्र्य कलाकारांना मुळीच नाही. भजनातील नमनात श्लोक व नामघोष यांचा समावेश होतो.

भजनाचे प्रारंभीचे नमन सादर करताना सुरवातीला स्वरांचे आलाप घेतले जातात. सुरवातीच्या स्वरालापावेळी हात जोडून देवाला नमस्कार करू नये. कारण, तो संगीताचा भाग आहे. नमनातील पहिला श्लोक सादर करताना सर्व कलाकारांनी एकत्रितपणे हात जोडून देवाला नमस्कार करावा. नमनाच्या शेवटी होणारा जयघोष संपेपर्यंत हात जोडणे कायम ठेवणे आवश्यक आहे.

नमनाच्या सुरवातीला स्वरालापानंतर श्रीगणेशाचा अथवा श्रीविष्णूचा श्लोक म्हणता येईल. दोन्ही पद्धती बरोबरच आहे आणि त्यात गैर असे काहीच नाही. श्री गणेशाचा श्लोक प्रारंभी म्हटल्यास त्यानंतर श्रीविष्णूचा श्लोक, अर्थांत ‘श्रीरामा पुरुषोत्तमा...’ म्हणावा आणि तदनंतर अन्य महत्त्वाचे श्लोक म्हणावेत. जर श्रीविष्णूचा श्लोक प्रारंभी म्हटल्यास श्रीगणेशाचा श्लोक त्यानंतर म्हणून अन्य महत्त्‍वाचे श्लोक म्हणावेत.

वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत श्रीविठ्ठलाच्या रूपातील श्रीविष्णू आहे. त्यामुळे, वारकरी परंपरेला अनुसरून भजनाची सुरवात श्रीविष्णूच्या श्लोकाने करावी, असा संकेत आहे. भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर हेसुद्धा त्याच संकेताचे प्रकर्षाने पालन करीत होते. म्हणूनच ते भजनात सुरवातीला ‘श्रीरामा पुरुषोत्तमा...’ हा श्रीविष्णूचा श्लोक म्हणायचे. आम्ही हिंदू धर्मातीतल कोणताही धार्मिक विधी करताना अथवा सण-उत्सव साजरा करताना सर्वप्रथम गणेशपूजन करीत असतो. त्यामुळे भजनातही सर्वप्रथम श्रीगणेशाचा श्लोक सादर करायला हरकत नाही. भजनात सर्वप्रथम श्रीगणेशाचा श्लोक म्हणण्याची प्रथा गोव्यात भजनाचार्य पं. सोमनाथबुवा च्यारी यांनी सुरू केली होती. ती प्रथा आता गोव्यातील कित्येक भजन कलाकार पाळतात. महाराष्ट्रातील भजनांत भजनाच्या सुरवातीला सर्वसाधारणपणे श्रीगणेशाच्या एखाद्या श्लोकाऐवजी संतांचा महिमा वर्णन करणारा ‘अलंकापुरी पुण्यभूमी...’ अथवा ‘श्रीरामा पुरुषोत्तमा...’ हा श्लोक सादर करण्याचा प्रघात आहे.

नमन झाल्यानंतर ‘जय जय रामकृष्ण हरी’ हा गजर सादर करावा. या गजरावेळी मध्येच ‘जय जय रामकृष्ण हरी’ ऐवजी ‘जय जय जय रामकृष्ण हरी’, ‘जय जय राम राम रामकृष्ण हरी’ असे वैविध्य सादर करायलाही हरकत नाही. सादरीकरणात नावीन्य, वैविध्य दिसावे या दृष्टिकोनातून असे प्रयोग अवश्य करावेत. या गजरावेळी उठान घेतल्यानंतर ‘हरी’ शब्दातील ‘ह’ या अक्षरापासून ‘दुगन’ सुरू करावी. हा गजर ‘जय जय राम रामकृष्ण हरी’ अशा स्वरूपात म्हणताना ‘मराऽ मराऽ’ असा उच्चार होऊ देता कामा नये. अर्थांत, गायन करताना उच्चारणातील दोषामुळे अथवा अजाणतेपणामुळे ‘राऽम राऽम’ या शब्दांचा उच्चार ‘मराऽ मराऽ’ असा नकळतपणे होण्याची संभावना असते. ‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजरात ‘‘राजाराम कृष्ण हरी’ असे शब्द वापरू नयेत; कारण, मूळ रचनेत तसा वापर केलेला नाही. ‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजराचे रचनाकार महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आहेत, असा दावा केला जातो.

‘जय जय रामकृष्ण हरी’ गजर झाल्यानंतर ‘रूपपर अभंग’ सादर करावा. ‘रूप पाहतां लोचनीं। सुख झालें वो साजणी।।’. ‘रूप सावळे सुकुमार। कानी कुंडले मकराकार।।’, ‘तुज पाहतां सामोरीं। दृष्टी न फिरे माघारीं।।’, ‘रूपी जडले लोचन। चरणी स्थिरावले मन।।’ यांपैकी एखादा अभंग यासंदर्भात सादर करता येईल. त्यानंतर लगेच पुन्हा ‘जय जय रामकृष्ण हरी’ गजर सादर करावा. त्या गजराच्या अखेरीस ‘रामकृष्ण हरी’ असा त्या गजराचा अल्पांश दोन-चार वेळा घेऊन व अखेरीस मोड घेताना दीर्घ आलाप घेऊन तो गजर संपवता येईल.

त्यानंतर सादर होणाऱ्या ‘सुंदर ते ध्यान’ या ‘ध्यानपर अभंगा’चे टाळवादन करताना सर्वसाधारणपणे एक ते आठ अशा सर्व मात्रांवर टाळ वाजवला जातो. याबाबत दुसरा प्रकार म्हणजे, आठ मात्रांपैकी एक, तीन, पाच, सात अशा केवळ चार मात्रांवर टाळ वाजूवून; दोन, चार, सहा व आठ अशा एकूण अन्य चार मात्रा खाली (रिक्त) सोडल्या जातात. अर्थांत टाळ न वाजवता त्या मात्रा रिकामी सोडल्या जातात. यासंदर्भात टाळवादनाचा एक वेगळा प्रकार म्हणून ‘सुंदर’ या शब्दातील ‘सुं’ या अक्षरावर टाळाची पहिली मात्रा वाजवून नंतर दुसरी, तिसरी व चौथी मात्रा न वाजवता रिकामी ठेवून ‘उभे’ या शब्दातील ‘उ’ या अक्षरापासून पुढच्या सर्व मात्रा (पाचव्या मात्रेपासून) वाजवता येतील. हा वेगळा प्रकार म्हणून रसिकांनाही आवडतो.

ध्यानपर अभंगानंतर जय विठोबा रखुमाई’ हा गजर सादर करावा. त्या गजराऐवजी तत्सम पूरक अन्य गजर करायला हरत नाही. सादरीकरणात वैविध्य आणण्यासाठी असे विविध प्रयोग करण्यास मुभा आहे. नामपर अभंगापूर्वी सादर होणाऱ्या या गजराची विविध रूपे प्रचलित आहेत. त्यापैकी अन्य उदाहरणे पुढीलप्रमाणे: ‘जय विठ्ठले रखुमाई’, ‘जय जय विठोबा रखुमाई’, ‘जय जय विठ्ठले रखुमाई’, ‘विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई’, ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’, ‘विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल’, ‘विठोबा विठोबा विठोबा रखुमाई’, ‘विठोबा विठोबा विठोबा विठोबा’. हा गजर म्हणताना एखाद्या कलाकाराने अथवा कार्यक्रमाच्या यजमानाने सर्व कलाकारांना तसेच अन्य उपस्थितांना बुक्का लावणे आवश्यक आहे. बुक्का लावण्यासंदर्भातही काही नियम-संकेत आहेत. भजनातील या टप्प्यातील श्रीविठ्ठलावरील गजराचे अन्य एक उदाहरण म्हणजे, ‘‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला, वाळवंटी चंद्रभागेच्या तटी डाव मांडीला; जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल; पांडुरंग विठाबाई, पंढरीचे आई.’’ पुनरावृत्ती न होऊ देता अशा स्वरूपाचा एखादा गजर अथवा गजराचा अल्पांश नामपर अभंगानंतरही सादर करण्यास हरकत नाही.

भजनातील नमन ने ‘जय विठोबा रखुमाई’ हा विठुनामाचा गजर या टप्प्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत वेळेचा अपव्यय न करता सलगपणे भजन सादरीकरण करणे आवश्यक आहे. त्या दरम्यान शक्यतो वाद्यांची स्वरजुळवणी शक्यतो करूच नये. अगदीच तशी गरज भासली तरच तसे करावे. अर्थांत, ‘जय जय रामकृष्ण हरी’ गजरानंतर लगेच रूपपर अभंग, पुन्हा ‘जय जय रामकृष्ण हरी’ गजर, नंतर ‘ध्यानपर अभंग व विठुनामाचा गजर असे सर्व टप्पे सलगपणे झाले पाहिजेत. सर्वांनी भक्तिमय वातावरण कायम राहावे यासाठी तसे करणे क्रमप्राप्त आहे.

‘जय जय विठोबा रखुमाई’ हा गजर संपण्यापूर्वी बुक्का लावणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची जबाबदारी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे, त्या कृतीत त्याची चपळाई असली पाहिजे. बुक्का लावणारी व्यक्ती सर्व कलाकारांना बुक्का लावून पुन्हा कलाकारांसमवेत बसल्यानंतरच नामपर अभंग सादर करण्यास सुरवात करता येईल. तथापि, अशा स्वरूपाची बंधने स्पर्धात्मक कार्यक्रमांत पाळणे शक्य होत नाही; कारण, तेव्हा त्या गजराच्या सादरीकरणासाठी अत्यंत कमी वेळ उपलब्ध असतो. त्यामुळे, तशा बंधनांबाबत थोडीशी मुभा घ्यायला हरकत नाही.

त्यानंतर नामपर अभंग झाल्यावर विविध प्रकारचे अभंग सादर करता येतील. उदाहरणार्थ, स्थितिपर, स्तुतिपर, संतपर, पंढरीमाहात्म्यपर, बोधपर, गुरुमहिमापर अभंग. नंतर गौळणींचे गायन व शेवटच्या टप्प्यात विनवणीपर अभंग (भैरवी) व आरत्या होतील.

विविध प्रकारचे अभंग सादर केल्यानंतर भजनाच्या उत्तरार्धात गौळणगायन करून भजनातील भैरवी, आरती, उपसंहार इत्यादी झाल्यानंतर पुढीलपैकी एखादा गजर अथवा तत्सम अन्य गजर घेता येईल. ‘‘पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी।’’, ‘‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम।’’. त्यानंतर पुढीलप्रमाणे जयघोष करावा. ‘‘श्री गजानन महाराज की जय।’’ ‘‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल।’’ ‘‘श्री ..... महाराज/ माता की जय।’’ (स्थानिक दैवताचा जयघोष). आणि शेवटी ‘‘श्री ज्ञानदेव-तुकाराम।’’

कोणते अभंग नामपर आहेत, व कोणते नाहीत याबाबत जाणकार मंडळीकडून जाणून घेणे आवश्यक ठरते. ‘‘घेता नाम विठोबाचे। पर्वत जळती पापांचे’’, ‘‘नाम तेची रूप, रूप तेची नाम। नामा रूप भिन्न नाही नाही।।’’ ही नामपर अभंगाची उदाहरणे आहेत. एखाद्या अभंगात ‘नाम’ हा शब्द आला म्हणजे तो नामपर अभंग असा गैरसमज काही जण करून घेतात; पण, ते चुकीचे आहे. तसेच, उखाद्या अभंगात ‘नामा म्हणे’ असे शब्द आले तो नामपर अभंग असे समजणे हासुद्धा गैरसमजच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com