डिचोलीत सुक्‍या मासळीला चांगले दिवस

Dainik Gomantak
गुरुवार, 21 मे 2020

साप्ताहिक बाजारातील गर्दीवर नियंत्रण
 

डिचोली

डिचोलीत भरलेल्या साप्ताहिक बाजारात नेहमीप्रमाणे गजबजाट जाणवला असला, तरी मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत आज बाजारातील गर्दीवर बरेच नियंत्रण होते. दरम्यान, आज बाजारात पुरुमेंताच्या वस्तूंसह सुक्‍या मासळीला मागणी वाढली होती.
मागील आठवड्यात तर साप्ताहिक बाजारात तर प्रचंड गर्दी उसळली होती. सामाजिक अंतराचाही फज्जा उडाला होता. अखेर गर्दी केलेल्या बाजारातील काही विक्रेत्यांना अन्यत्र हटवण्याची पाळी पालिका मुख्याधिकाऱ्यांवर आली होती. पावसाळा जवळ आल्याने खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी उसळणार अशी शक्‍यता होती. बाजारात ग्राहकांची वर्दळही वाढली होती. मात्र, पालिकेने आज बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले. काही नगरसेवक तसेच पालिकेचे मार्केट निरीक्षक आणि कर्मचारी बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यातच गावठी तसेच राज्याबाहेरील लाल मिरची विक्रेत्यांची मागील साप्ताहीक बाजारापासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर बसण्याची व्यवस्था केल्याने बाजारातील गर्दीवर नियंत्रण येण्यास मदत झाली. बाजारात पुरुमेंताच्या वस्तूंसह आंबेही मोठ्या प्रमाणात विक्रीस आले होते. पोलिसही बाजारातील स्थितीवर लक्ष ठेवून होते.

सुकी मासळी गायब..!
डिचोलीत मासळी उपलब्ध होत असली, तरी ती महाग आहे. त्यातच मासळी ताजी आणि रुचकर असणारच याचा भरंवसा नसल्याने बहूतेक मत्स्यखवय्ये सुक्‍या मासळीला पसंती देतात. त्यातच पुरुमेंताचा बाजार असल्याने आज सुक्‍या मासळीला प्रचंड मागणी होती. सुक्‍या मासळीची खरेदी आज जोरात होती. सुक्‍या मासळीची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसमोर ग्राहकांनी रांगा केल्या होत्या. दुपारपर्यंत बाजारातून सुकी मासळी गायब झाली होती.

 

संबंधित बातम्या