विद्यार्थ्यांच्या पाऊलांनी दुमदुला फोंडा तालुक्‍यातील शाळेचा परिसर

 विद्यार्थ्यांच्या पाऊलांनी दुमदुला फोंडा तालुक्‍यातील शाळेचा परिसर
Good facilities for class teaching in Fonda taluka

फोंडा: गेले आठ महिने बंद असलेल्या विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या परिसरात (शनिवारी) विद्यार्थ्यांची पावले पडल्याने या शाळा परिसरात "जान'' आल्याची भावना पालक आणि शिक्षकांत व्यक्त करण्यात आली. फोंडा तालुक्‍यातील विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे विविध शाळा व्यवस्थापनानी सांगितले. विशेष म्हणजे प्रत्येक वर्गात किमान नव्वद टक्के उपस्थिती होती. 


फोंडा तालुक्‍यातील दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने तसेच मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने आवश्‍यक खबरदारी घेतल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यासाठी सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान तपासणे, मास्क व सामाजिक अंतर राखण्याबरोबरच वर्गात आवश्‍यक अंतर राखून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. वास्तविक शैक्षणिक वर्ष गेल्या जूनमध्ये सुरू झाले असले तरी कोरोना महामारीमुळे मोबाईलद्वारे ऑनलाईन शिकवणी सुरू करण्यात आली होती. पण या शिकवणीबाबत बऱ्याच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष शिकवणीची आवश्‍यकता निर्माण झाली होती. यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत होती, त्यादृष्टीने सरकारने दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करून यंदाचे वर्ष वाया जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 


सर्वांत जास्त विद्यार्थी आल्मेदा हायस्कूलमध्ये...!
राज्यात सर्वात जास्त दहावी इयत्तेतील विद्यार्थी हे फोंड्यातील आल्मेदा हायस्कूलमध्ये असतात. यंदाही या विद्यालयात दहावीचे 406 विद्यार्थी असून एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वर्ग व इतरांनी शाळा व्यवस्थापनाच्या सहकार्याने व्यवस्थित नियोजन केले असल्याचे यावेळी जाणवले. 


विद्यालयांनी पाळले नियम...
कोरोनाची महामारी संपलेली नाही. त्यामुळे आवश्‍यक ती खबरदारी घेऊनच वर्ग सुरू करण्याची सूचना राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने केल्याने त्यादृष्टीने फोंडा तालुक्‍यातील सर्वच विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांनी खबरदारी घेऊनच वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी सामाजिक अंतर राखणे, वर्ग सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे आदींचा प्रभावी वापर केला असल्याचेही निदर्शनास आले आहे. फोंडा शहराबरोबरच शिरोडा, बोरी, मडकई, प्रियोळ, सावईवेरे, खांडेपार, बेतोडा, उसगाव, कुंडई, भोम, माशेल तसेच इतर भागातील सर्वच विद्यालयांनी ही खबरादारी घेतली असल्याने पालकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

सरकारी अध्यादेशानुसार विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोविडसंबंधीच्या सर्व मार्गदर्शक सूचना व तत्वांचा अवलंब करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची खबरदारी घेण्याबरोबरच पालकांनीही चांगले सहकार्य केले आहे. त्यामुळे शिकवणी घेणे सोयिस्कर ठरेल.
 - अमिता तळावलीकर (मुख्याध्यापिका, आल्मेदा हायस्कूल, फोंडा)

आमच्या विद्यालयात खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जास्त भरणा असतो. ग्रामीण भागात ऑनलाईनची बऱ्याचदा समस्या निर्माण होते, त्यामुळे आता प्रत्यक्ष शिकवणीला पालकांचे चांगले सहकार्य लाभले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यालयात आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. 
- स्नेहा पंडित (मुख्याध्यापिका, दादा वैद्य हायस्कूल कुर्टी)

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com