कीर्तन कलेच्या माध्यमातून सुविचारांची देवाणघेवाण

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कवळे येथील सरस्वती विद्यालय सभागृहात सुरू झालेल्या या कीर्तन कला संवाद उपक्रमाची सांगता आडपई येथील दत्त मंडपात झाली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कीर्तनकार गजाननबुवा नाईक तसेच प्रमुख वक्ते म्हणून गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालयाचे अध्यापक सुहास वझेबुवा उपस्थित होते.

फोंडा : कीर्तन कलेच्या माध्यमातून सुविचारांची देवाणघेवाण होत असल्याने समाज हितासाठी अशाप्रकारचे उपक्रम आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ कीर्तनकारांनी सम्राट क्‍लब कपिलेश्‍वरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कला संवाद या कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिक्षक तसेच पालक प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कवळे येथील सरस्वती विद्यालय सभागृहात सुरू झालेल्या या कीर्तन कला संवाद उपक्रमाची सांगता आडपई येथील दत्त मंडपात झाली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कीर्तनकार गजाननबुवा नाईक तसेच प्रमुख वक्ते म्हणून गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालयाचे अध्यापक सुहास वझेबुवा उपस्थित होते. इतर मान्यवरांत सम्राट क्‍लब कपिलेश्‍वरीचे अध्यक्ष प्रशांत नाईक, सचिव जयंत कवळेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदेश पारोडकर आदी उपस्थित होते.  

गजाननबुवा नाईक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. गजाननबुवा नाईक यांनी यावेळी कीर्तन कला संवादातून कीर्तनकलेविषयी सुविचारांची देवाणघेवाण होत असल्याने सुदृढ समाजासाठी आणि चांगले विचार पेरण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन व्हायला हवे, असे सांगितले. कला सत्संगातून सांस्कृतिक मैत्रीचा पाया रचला जातो म्हणूनच सुसंवाद हा सांस्कृतिक मैत्रीचा अनुबंध असल्याचे गजाननबुवा नाईक म्हणाले. 
सुहास वझेबुवा यांनी कीर्तन कलारंग हा खऱ्या अर्थाने कलेच्या प्रोत्साहनासाठी उपक्रम असून कलेचे सादरीकरण होणे हे महत्त्वाचे असून बाल आणि युवा कलाकारांना त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे नमूद केले. सम्राट क्‍लब कपिलेश्‍वरीतर्फे सांस्कृतिक, सामाजिक आणि इतर अनेक समाजोपयोगी उपक्रम साकारले जात असल्याने सम्राटची बांधिलकी ही समाजाप्रती असल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी उद्‌गार काढले. 

यावेळी कीर्तनकार बुवांनी विद्यालयातील शिक्षक व पालक प्रतिनिधींशी संवाद साधता सामाजिक परिस्थिती आणि कीर्तन कलेचे महत्त्व यासंबंधी माहिती दिली. प्रशांत नाईक यांनी स्वागत केले. नीलेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर जयंत कवळेकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या