ऑनलाईन प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

विलास महाडिक
गुरुवार, 16 जुलै 2020

राज्यात सरकारी तसेच अनुदानित मिळून ३४ महाविद्यालये आहेत. त्यापैकी ७ महाविद्यालये ही सरकारी आहेत तर २७ महाविद्यालये अनुदानित आहेत.

पणजी

राज्यातील महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमासाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून ( १५ जुलै) सुरू झाली. पहिल्याच दिवशी सुमारे हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया येत्या २३ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाकडून प्रवेश यादी ऑनलाईनवर प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती उच्च शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
राज्यात सरकारी तसेच अनुदानित मिळून ३४ महाविद्यालये आहेत. त्यापैकी ७ महाविद्यालये ही सरकारी आहेत तर २७ महाविद्यालये अनुदानित आहेत. प्रत्येक महाविद्यालयामध्ये वेगवेगळे पदवी अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना त्याना ज्या शाखेत प्रवेश घ्यायचा त्या महाविद्यालयाची नावे या ऑनलाईन प्रक्रियेवेळी नमूद करायची आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवेळी प्रत्येक अर्जदार विद्यार्थ्याला ‘लॉगिन’ देण्यात येते. त्यामुळे त्याने प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर त्याला जर त्यात बदल करायचा असल्यास तो हे ‘लॉगिन’ वापरून त्यात बदल करू शकतो ही सोय ठेवण्यात आली आहे. उच्च शिक्षण खात्यातर्फे या ऑनलाईन प्रवेशासाठी सर्व महाविद्यालयांसाठी समान पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे प्रवेश घेणाऱ्यांना या टाळेबंदीच्या काळात प्रत्यक्षात महाविद्यालयात जाण्याची गरज नाही. २३ जुलैनंतर प्रत्येक महाविद्यालयातर्फे प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या खात्यातर्फे महाविद्यालयांना प्रवेशास एक समान पोर्टल उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. 

 

goa goa goa 

 

संबंधित बातम्या