गोमंतकीयांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

UNI
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

गोवा राज्यात पायाभूत सुविधांचे निर्माण महत्त्वाचे आहेच; परंतु, त्याचबरोबर गोमंतकीयांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. आरोग्य संचालनालयातर्फे म्हापसा येथील सारस्वत विद्यालय संकुलात आयोजित नेत्रतपासणी शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

म्हापसा - गोवा राज्यात पायाभूत सुविधांचे निर्माण महत्त्वाचे आहेच; परंतु, त्याचबरोबर गोमंतकीयांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. आरोग्य संचालनालयातर्फे म्हापसा येथील सारस्वत विद्यालय संकुलात आयोजित नेत्रतपासणी शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आमदार ज्योशुआ डिसोझा, म्हापसा नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. शॅरल डिसोझा, डॉ. जोस डिसा, डॉ. राजेश परब, डॉ, धनजंय तसेच रूपेश कामत हे व्यासपीठावर उपस्थित होते. उडुपी येथील प्रसाद नेत्रालय, गोव्यातील कलरकॉन एशिया प्रायव्हेट लिमिटेड, बंगळुरू येथील एसिलोर व्हिजन फाउंडेशन, उडुपी येथील नेत्र ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट आदींच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात रुग्णांची नेत्रतपासणी करून त्यांना मोफत औषधे व चष्मे वाटप करण्यात आले. या रुग्णांपैकी गरजवंतांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

डॉ. सावंत पुढे म्हणाले, सरकारने आयोजित केलेले हे नेत्रतपासणी शिबिर गोव्याच्या साठाव्या मुक्तिदिनाच्या समारंभाचाच एक भाग आहे. अशी शिबिरे शहरांनंतर सर्व ग्रामपंचायत क्षेत्रांतही आयोजित केली जातील.

नेत्रतपासणीनंतर ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल, त्यांच्यासाठी एप्रिलपासून तालुका स्तरावरील आरोग्यकेंद्रांत त्यासंदर्भातीतल सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

येत्या काळात रक्तदाब, साखर तसेच हृदयविकार आदींबाबत तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाईल. लोकांना शंभर टक्के दृष्टी मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे स्पष्ट करून डॉ. सावंत यांनी सांगितले, की सध्या सुमारे पंधरा लाख लोकसंख्या गोव्यातील अंधत्वाची ०.४५ ही टक्केवारी थोडीफार जास्तच आहे, असे म्हणावे लागेल. ती कमी करण्यास सरकार प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

आमदार ज्योशुआ डिसोझा म्हणाले, डोळे हे शरीराचे महत्वाचा अवयव असून, प्रत्येकाने त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. सध्या नेत्रतपासणीच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असला तरी अनेकांना अशा प्रगत तंत्रज्ञानाची कल्पना नाही. तसेच, आर्थिक कारणांस्तव अनेक जण उच्चतम उपचार घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन केल्याचे ते 
म्हणाले.

सरकारतर्फे अशा स्वरूपाच्या नेत्रतपासणी शिबिरांना डिचोली तालुक्यात सुरवात झाली असून तिथे १,०३४ व्यक्तींनी त्याचा लाभ घेतला, असा दावा करून म्हापसा शहरात सुमारे ६०० ते ९०० रुग्णांना लाभ अशा शिबिराच्या अंतर्गत लाभ मिळेल अशी अपेक्षा आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी व्यक्त केली.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या