गोवा: सरकारला सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसुतक नाही : डॉ. केतन भाटीकर

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

मात्र कोविड इस्पितळ करताना फोंडा तालुका व लगतच्या भागातील इतर आजारांच्या रुग्णांचे काय, याबाबत सरकारकडून कोणतेच उत्तर नसल्याने हा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप फोंड्यातील मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केला आहे.

फोंडा:  "आधीच उल्हास त्यात फाल्गून मास'' असा प्रकार सध्या सरकारच्याबाबतीत झाला असून वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहून सरकारने आता पुन्हा एकदा फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ कोरोना इस्पितळ करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी या इस्पितळाला भेट देऊन पाहणीही केली.  मात्र कोविड इस्पितळ करताना फोंडा तालुका व लगतच्या भागातील इतर आजारांच्या रुग्णांचे काय, याबाबत सरकारकडून कोणतेच उत्तर नसल्याने हा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप फोंड्यातील मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केला आहे. (The government does not care about the health of ordinary citizens: Dr. Ketan Bhatikar) 

गोव्यातील 58 हजार 746 दात्यांना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आवाहन

फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ मागच्या वेळेला कोविड इस्पितळ घोषित करून इतर आजाराच्या रुग्णांची हेळसांड केली. कोविड इस्पितळ करण्यास कुणाची हरकत नाही, पण अन्य आजाराच्या रुग्णांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळायला नको का, असा सवाल करून मनमानेल तसा कारभार चालला असून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे सरकारला कोणतेच सोयरसुतक नसल्याचे केतन भाटीकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

अल वहादचे धोकादायक आक्रमण रोखत; गोलरक्षक धीरजचा भक्कम बचाव

फोंड्यातील या सरकारी इस्पितळात अद्ययावत सुविधा उपलब्ध नाहीत, सीटी स्कॅनचा पत्ता नाही, रक्तपेढीबाबत उदासीनता आहे. मगो पक्षाने या इस्पितळातील गैरसोयींबाबत आवाज उठवला होता, त्यावेळेला सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते, मात्र या अद्ययावत सुविधांसाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बांबोळी इस्पितळाचे हेलपाटे मारावे लागतात. याला जबाबदार कोण असा सवाल करून मागे फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ अचानकपणे कोविड इस्पितळ करून येथील रुग्णांची अतिशय गैरसोय केली. आरोग्य खात्याचा कारभार रामभरोसे चालला असून कोविडच्या नावाखाली इतर आजाराच्या रुग्णांना वेठीस धरण्याचा हा प्रकार चालला असून एकतरी प्रशासन सुधारा किंवा रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करा, असे केतन भाटीकर म्हणाले.

कोविड काळात तातडीची सुविधा हवी असते, हे मान्य केले तरी अन्य आजाराच्या रुग्णांना सुविधा कुठे मिळणार, फोंड्यातील या इस्पितळात डायलिसीस रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात, त्यांची सोय कुठे करणार, असा सवाल करून एकतरी सरकारने फोंड्याहून बांबोळी इस्पितळात जाण्यासाठी रुग्णांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करताना बसगाड्या ठेवाव्यात, त्यामुळे लोकांचे हेलपाटे वाचतील आणि पैसेही वाचतील. सध्या कोरोनामुळे लोकांच्या आमदनीवर परिणाम झाला असून फोंड्याहून बांबोळीला जायचा भूर्दंड पडतो. त्यामुळे फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ कोविड इस्पितळ म्हणून जाहीर करण्यापूर्वी आधी इतर आजारांच्या रुग्णांना सुविधा उपलब्ध करा, आणि मगच काय तो निर्णय घ्या, असे केतन भाटीकर यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या