COVID-19 Goa: मृत्यू रोखण्यात सरकारला अपयश: 24 तासात 44 कोरोनाबाधितांचा मृत्यू 

COVID-19 Goa: मृत्यू रोखण्यात सरकारला अपयश: 24 तासात 44 कोरोनाबाधितांचा मृत्यू 
goa corona update

पणजी: राज्य सरकार कोरोना नियंत्रणासाठी विविध प्रयत्न करत असताना कोरोनामुळे (Coronavirus) होणारे मृत्यू मात्र ते टाळू शकलेले नाही. आरोग्य खात्याच्या अथक प्रयत्नानंतरही कोरोनामुळे होणारे मृत्यू काही केल्या थांबण्यास तयार नाहीत. आज तब्बल 44 कोरोनाबाधितांना मृत्यूने गाठले. त्यामुळे ही मृत्यूंची संख्या केव्हा थांबेल हाच प्रश्न गोमंतकीयांना भेडसावत आहे. राज्य सरकारने (Goa Government) कोविड इस्पितळावरील भार कमी व्हावा यासाठी राज्यात अनेक ठिकाणी स्टेप-अप कोरोना उपचार केंद्रे (COVID-19 Step-Up Centre) स्थापन केली आहेत. सरकारी डॉक्टर कमी पडतात म्हणून कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांना या स्टेप-अप इस्पितळांमध्ये कामाला लावले. त्यामुळे नव्या कोरोनाबाधितांची संख्या जरी काही प्रमाणात कमी होत असली व कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू काही केल्या थांबताना दिसत नाहीत आणि हीच गोव्यासाठी चिंतेची बाब बनली आहे.(Government failure to prevent deaths: 44 corona patients die in 24 hours)

विरोधक याच गोष्टीचा लाभ घेऊन सरकारवर विविध माध्यमातून जोरदार टीका करत असून गोवा सरकारच्या कोरोना व्यवस्थापनाची असफलता यातून स्पष्ट होत असल्याची टीका करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे (Vishwajit Rane) हे जातीने विविध इस्पितळांमध्ये भेट देऊन तेथील कोरोना उपचाराचा आढावा घेऊन कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी संबंधितांना आदेश देत आहेत. एवढे करूनही कोरोनाबाधित मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होत नाही. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 4,581 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. यापूर्वी स्वॅब चाचणी केलेल्यांमधील 1,582 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

गेल्या चोवीस तासांमध्ये 3,694 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी 83.70 टक्के एवढी वाढली आहे. सहा दिवसापूर्वी ती 70 टक्क्यांपेक्षा खाली होती. आज जे 1,582 नवे कोरोनाबाधित सापडले. त्यातील 1,381 जणांनी घरीच अलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेण्याचे ठरवले असून 201 कोरोनाबाधित व्यक्ती इस्पितळांमध्ये दाखल झाले आहेत. आज दिवसभर 189 कोरोनाबाधितांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 808 एवढी झाली आहे. आठ दिवसांपूर्वी ती 32 हजाराच्या आसपास होती. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 2272 झाली आहे. आज जे 44 जण दगावले त्यातील 22 जण गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते. 12 दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात, 2 इएसआय इस्पितळात व इतर विविध खासगी व सरकारी इस्पितळात उपचार घेत होते. मडगाव येथे 1925 कोरोनाबाधित सापडले असून पणजी येथे 1233, चिंबल येथे 1164, फोंडा येथे 1095 कोरोनाबाधित सापडले आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com