नावे गायब करुन उतारा केला कोरा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

१९९६ साली त्या जमीन उताऱ्यावर कोणाचेही नाव नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तसेच आता नवीन काढलेल्या क्रमांकाच्या एक चौदाच्या उताऱ्यावर कोणाचेही नाव नाही. म्हणून हे कोणी कृत्य केले आहे

 

वाळपई : सध्या राज्यात गाजत असलेल्या मेळावली गावातील आयआयटी संस्थेविरोधातील आंदोलनात एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. १९९० साली पंचायतीने मेळावली गावातील सर्वे क्रमांक ६७/१ जागेतील एक चौदाच्या उताऱ्यावर अकरा जणांची नावे होती व तशी कागदपत्रे नागरिकांना देण्यात आली होती. तसा दावा लोकांनी केला आहे. पण १९९६ साली त्या जमीन उताऱ्यावर कोणाचेही नाव नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तसेच आता नवीन काढलेल्या क्रमांकाच्या एक चौदाच्या उताऱ्यावर कोणाचेही नाव नाही. म्हणून हे कोणी कृत्य केले आहे. त्या व्यक्तीवर सरकारने कारवाई करून त्या अकरा जणांची नावे उताऱ्यावर पुन्हा नमूद करावी असे एक निवेदन आज गुरुवारी मेळावलीवासीयांनी उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना सादर केले आहे. 

सदर निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आले आहे. आज मेळावलीवासीयांनी सकाळी वाळपई शहरात निषेध रॅली काढून मेळावलीत कदापीही आयआयटी संस्था नकोच म्हणून घोषणा देत वाळपई शहरात सरकार विरोधात प्रखर रोष व्यक्त केला. यावेळी मेळावलीतील शशिकांत सावर्डेकर, राम मेळेकर, तसेच काँग्रेसचे वाळपई अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, रणजीत राणे, नंदकुमार कोपार्डेकर, रोशन देसाई आदींची उपस्थिती होती. मेळावलीच्या महिला वर्गाने मोठी उपस्थिती लावली होती. शशिकांत सावर्डेकर म्हणाले सध्या ज्या ६७/१ जागेत सरकार आयआयटी बांधण्याचा विचार केला आहे त्याच सर्वे क्रमांकाच्या जागेत १९९० साली अकरा जणांची नावे जमीन उताऱ्यावर नमूद होती.

पण ती नावे कोणीतरी गायब करुन उतारा कोरा केला आहे. म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी. हा प्रकार म्हणजे मेळावली लोकांची निव्वळ अन्याय आहे. मेळावली लोकांची निव्वळ फसवणूक सरकारने केली आहे असे सावर्डेकर म्हणाले. सरकारने कितीही प्रयत्न केला तरीही आमचा निर्णय बदलणार नाही. मेळावलीतून या शैक्षणिक संस्थेला कायमचे हद्दपार करावे असे यावेळी लोकांनी ठामपणे सांगितले. दशरथ मांद्रेकर म्हणाले मेळावलीतील लोक एकसंध आहेत. त्याच्यामध्ये दडपशाही वापरून सरकारने पाऊल उचलू नये. प्रसंगी आम्ही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना वाळपईत आल्यास काळेबावटे दाखवणार आहोत असे मांद्रेकर म्हणाले.

संबंधित बातम्या