‘रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे’

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

राज्यात कोळसा वाहतूक झाल्यास याचा थेट फटका पर्यटन व्यवसायाला बसणार असल्याने गोवा सरकारने रेल्वे रुळाच्या दुपदरीकरणावर गांभीर्याने विचार करून यावर रोख लावणे आवश्यक आहे.

सासष्टी :  राज्यात कोळसा वाहतूक झाल्यास याचा थेट फटका पर्यटन व्यवसायाला बसणार असल्याने गोवा सरकारने रेल्वे रुळाच्या दुपदरीकरणावर गांभीर्याने विचार करून यावर रोख लावणे आवश्यक आहे. सरकारने यावर रोख न लावल्यास येणाऱ्या काळात सरकारला मोठ्या संख्येने रस्त्यांवर विरोधकर्त्यांना सामोरे जावे लागतील, असा इशारा बाणावली आमदार चर्चिल आलेमाव यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. तर गोव्यात रेल्वे दुपदरीकरण का करण्यात येत आहे हे सरकारने स्पष्ट करावे, असेही त्यांनी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याला पर्यटक स्थळ म्हणून ओळखण्यात येत असून राज्यातील पर्यटन व खाण व्यवसायामुळे लोकांना रोजगार आणि सरकारला महसूल प्राप्त होतो. खाण व्यवसाय बंद असल्याने पर्यटन व्यवसाय हा आर्थिक कणा बनला होता. पण, कोरोनामुळे पर्यटन व्यवसायही मंदावला आहे. आता सरकारने मंदावलेल्या पर्यटनाला बळकटी देणे आवश्यक आहे. पण, सरकार गोव्यात कोळसा आणून राज्याची अर्थव्यवस्था आणखीनच कमकुवत बनविण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल चर्चिल आलेमाव यांनी केला. 

गोव्यात मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक करण्यासाठी सरकार रेल्वे रुळाचे दुपदरीकरण करीत असल्यामुळे गोमंतकीय नागरिक या दुपदरीकरणास विरोध करीत आहे. सरकारने अडाणी आणि जिंदाल या दोन व्यक्तींच्या फायद्यासाठी गोमंतकीय जनतेला धोक्यात घालणे चुकीचे आहे. गोव्यात कोळसा आणणार नाही असे स्पष्टीकरण मुखमंत्र्यांनी दिले आहे.  जर गोव्यात कोळसा वाहतूक करण्यात येणार नाही, तर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण का करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी दुपदरीकरण का करण्यात येत आहे, याबद्दल स्पष्ट करावे, अशी चर्चिल यांनी मागणी केली.

संबंधित बातम्या