‘कोविड’ रोखण्‍यास सरकार अपयशी

Prashant Shetye
गुरुवार, 30 जुलै 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यानी ‘कोविड’ हाताळणीबद्दल केलेले सर्व दावे खोटे ठरत आहेत. आज कोविड चाचणीचे ७ हजारपेक्षा जास्त अहवाल प्रलंबित आहेत. या आकडेवारीवरून सरकारने ४० दिवसांच्‍या टाळेबंदीच्‍या काळात काहीच पूर्वतयारी केली नव्हती, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.

प्रशांत शेटये

मडगाव :

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यानी ‘कोविड’ हाताळणीबद्दल केलेले सर्व दावे खोटे ठरत आहेत. आज कोविड चाचणीचे ७ हजारपेक्षा जास्त अहवाल प्रलंबित आहेत. या आकडेवारीवरून सरकारने ४० दिवसांच्‍या टाळेबंदीच्‍या काळात काहीच पूर्वतयारी केली नव्हती, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.

मडगावचे ‘कोविड’ इस्पितळ एक समस्या बनली असून तेथील कर्मचारी वर्ग हवालदिल झाला आहे. कामाचा ताण व पर्यायी व्यवस्था करण्यात सरकार असमर्थ ठरल्याने कोविड हाताळणी करणाऱ्या यंत्रणेचा डोलाराच कोसळण्याची भिती निर्माण झाली, असे कामत यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले, यावेळी दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस व सरचिटणीस सुभाष फळदेसाई हे उपस्थित होते.

एकसूत्रतेचा अभाव
कोविड संसर्ग झालेल्यांच्या कुटुंबियाची चाचणी करणे सरकारला जमत नाही, हे धक्कादायक आहे, असे मत कामत यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचा वापर कोविड केंद्र म्हणून करणार नसल्याचे सांगतात. आरोग्य सचिव दुसऱ्या कोविड इस्पितळाची गरज नसल्याचे वक्तव्य करतात. आरोग्यमंत्री भलतेच काही तरी बोलतात. परंतु, खासगी इस्पितळातील अतिदक्षता विभागात २० टक्के खाटा आरक्षित करण्याचा आदेश सरकार मागे घेत नाही, असे कामत यांनी सांगितले.

आज कोविडचे ३९ मृत्यू झाले आहेत. तरीही सरकार लोकांप्रती असंवेदनशील आहे, असा आरोप त्यांनी केला. कोविड व राज्याच्या आर्थिक परिस्‍थितीवर श्‍वेतपत्रिका काढण्यास सरकार का घाबरत आहे, हे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट करावे.
-दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

पर्यावरणाच्या रक्षणास सदैव पाठिंबा
मोले राष्ट्रीय उद्यान, महावीर अभयारण्य तसेच करमल घाट येथे झाडांची कत्तल करुन महामार्ग रुंदीकरण, रेल्वे रुळांचे दुपदरीकरण व वीज वाहिनी टाकण्याच्या कामास माझा विरोध आहे. पुढील दोन दिवसात मी केंद्रीय पर्यावरण समितीला माझे निवेदन पाठवणार आहे, असे कामत यांनी सांगितले.
रेल्वे रुळांचे दुपदरीकरण करण्यासबंधी कोणत्याही बैठकीत मी सहभागी झालेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंबंधी अफवा व खोटी माहिती पसरवीणाऱ्यांचा मी निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. सरकारने ३१ ऑगस्‍टपर्यंत शिक्षकांना घरातून काम करण्याच्या दिलेल्या आदेशाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस पक्षाने मागणी केलेली १०० कोटींचे आर्थिक पॅकेज सरकारने त्वरित जाहीर करावे व सामान्य जनतेस दिलासा द्यावा, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

- महेश तांडेल

संबंधित बातम्या