दुपारी १२ वाजल्‍यानंतर नेमके काय झाले?

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

उपजिल्हाधिकाऱ्यांनी जेवणाची सुटी झाल्‍यावर परवानगी देतो असे आश्‍‍वासन दिले. मात्र, साडेतीन वाजता परवानगी नाकारल्याचे नोटीस हाती दिली. त्या अगोदरच मोठ्या प्रमाणात पोलिस फौज घटनास्थळी दाखल केली होती

 मोरजी : मांद्रे येथील हायस्‍कूलच्‍या पटांगणावर मगोची सभा १६ रोजी आयोजित केली होती. त्यासाठी पंचायत आणि मैदानाची परवानगी घेतली होती. जीत आरोलकर हे हजारो समर्थकांसह सोमवारी प्रवेश करणार याविषयी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील गावागावात प्रसिद्धी झाली होती. सामाजिक माध्यमातून वेगवगळ्या प्रतिक्रिया आणि मागोत प्रवेश करण्याची जागृती केली जात होती. आठ दिवसापूर्वी सभेच्या परवानगीसाठी त्यांनी अर्ज केला होता. दरदिवशी त्याचा पाठपुरवा केला जात होता. १६ रोजी दुपारी १२ वाजता जीत यांचे समर्थक उपजिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. उपजिल्हाधिकाऱ्यांनी जेवणाची सुटी झाल्‍यावर परवानगी देतो असे आश्‍‍वासन दिले. मात्र, साडेतीन वाजता परवानगी नाकारल्याचे नोटीस हाती दिली. त्या अगोदरच मोठ्या प्रमाणात पोलिस फौज घटनास्थळी दाखल केली होती.

आठ दिवसांपूर्वी मागितली होती परवानगी
आरोलकर यांनी मगो पक्षात प्रवेश करण्यासाठी आणि सभेसाठी आठ दिवसापूर्वी कायदेशीर परवानगीसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी यांना अर्ज केला होता. मात्र उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांनी १६ रोजी सायंकाळी साडेतीन वाजता परवानगी नाकारल्याचे आयोजकांना कळवले. मात्र मोठ्या संख्येने पोलिस दुपारी ३ वाजल्यापासूनच घटनास्थळी उपस्थित होते. कुणालाच सभेच्या स्थळी यायला पोलिसांनी दिले नाही. पोलिसांनी सभा होऊ दिली नाही.

फलकही काढले
मगो प्रवेशासाठी वातावरण निर्मितीसाठी मगो कार्यकर्त्यांनी सर्वत्र फलक लावले होते. वीज खांबांवरही मगो निशाणीचे फलक लावले होते. त्यासाठी जीत आरोलकर यांनी वीज विभागात वीज खांबावर फलक लावण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र वीज खात्याने अशी परवानगी यापूर्वीही कुणालाही दिली नाही, असे कारण सांगितले. मात्र मगोने लावलेले सर्व फलक वीज कर्मचाऱ्यांनी काढले, अशी माहिती जीत आरोलकर यांनी दिली.

समर्थकांसह प्रवेश 
यावेळी जीत आरोलकर यांच्यासोबत मांद्रेचे सरपंच आम्रोज फर्नांडिस, पंच अस्वेता मांद्रेकर, पंच सुभाष आसोलकर, किशोर नाईक, तेरेखोल पंच आग्नेल, माजी पोलिस अधिकारी नारायण उर्फ नाना सोपटे केरकर, पंच गुणाजी ठाकूर, आदींनी माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर, प्रवीण आर्लेकर, श्रीधर मांजरेकर व मगो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
पोलिस अगोदर कसे पोहोचले?
सोमवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आम्हाला परवानगी दिली नव्हती, तर मग पोलिस त्यापूर्वीच मोठ्या संखेने घटनास्‍थळी कसे तैनात केले होते, असा सवाल सुदिन ढवळीकर यांनी उपस्‍थित केला. पोलिसांना अगोदरच परवानगी नाकारली हे कसे कळले, याचा खुलासा करावा, असेही ढवळीकर म्‍हणाले.

जीत आरोलकर
युवा उद्योजक जीत आरोलकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून हा प्रवेश म्हणजेच मगोची ताकत या मतदारसंघात वाढवण्यास मदत होणार आहे. आपल्याला परवानगी नाकारणे म्हणजे विरोधकांना भीती वाटली. स्थानिक आमदार व पेडणेचे आमदार यांनी अधिकाराचा दबाव आणून परवानगी नाकारली. या विरोधकांना मगो पक्षाची भीती वाटते, असा दावा त्‍यांनी केला. जीत आरोलकर यांना प्रवेश दिल्यानंतर मगोच्या नेत्यांसहित समर्थकांच्या उपस्थितीत गोव्‍याचे पहिले मुख्‍यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.

सरकारचा निषेध
सभेला परवानगी नाकारल्‍याच्‍या घटनेचा मगो समर्थकांनी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. उपस्थित मगो कार्यकर्त्यांनी मामलेदार गौतमी परमेकर आणि मामलेदार कामत व पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांना मागच्या आठ दिवासांपूर्वी भाजपची सभा झाली. त्‍या सभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  हे उपस्थित होते. त्या सभेला सरकारने परवानगी दिली होती का? असा सवाल नागरिकांनी करून या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

लोकशाहीचा खून : प्रभुदेसाई
ऐनवेळी परवानगी नाकारल्‍याने देवेंद्र प्रभू देसाई यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्‍यक्‍त करताना म्‍हणाले, सरकारने लोकशाहीचा खून केला आहे. ही हिटलरशाही असून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. जीत आरोलकर मगो पक्षात प्रवेश करणार ही भीती स्थानिक आमदाराला होती, म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्‍यामार्फत सभेला परवानगी नाकारली. त्याचा बदला येत्या निवडणुकीत मांद्रेतील जनता घेईल असा विश्वास प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा:​

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न आठ दिवसांत निकाली काढा: समितीने दिला आंदोलनाचा इशारा

संबंधित बातम्या