सरकारचे ‘माय गोवा पोर्टल’ सुरू

Avit Bagle
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

‘माय गोवा पोर्टल’ सुरू करणारे गोवा हे १३ वे राज्य ठरले आहे. यातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. यातून राष्ट्रीय पातळीवरून इतर राज्यांशी राज्य माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले गेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पणजी
मुख्यमंत्र्यांनी आज माय गर्व्हर्नमेंट पोर्टलचे कळ दाबून उद्‍घाटन केले. www.goa.mygoa.in या पोर्टलवर सरकारी धोरणे, निर्णय यावर चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, जनतेलाही आपली मते या पोर्टलवर व्यक्त करता येतील. विविध क्षेत्रांत इतर राज्ये करत असलेल्या कामांची तुलना या पोर्टलच्या माध्यमातून होऊ शकणार आहे. कोविड महामारीविरोधात लढण्यासाठी इतर राज्ये करत असलेली कामेही समजणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणावर या पोर्टलवर सुरू असलेल्या चर्चेत गोमंतकीयही सहभागी होऊ शकणार आहेत. सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी पोर्टलवरील चर्चेचा फायदा होणार आहे.
कोविडनंतरच्या वातावरणात आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपूर्ण गोव्याची निर्मिती करावी लागणार आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. समाजातील शेवटची व्यक्तीही आपले म्हणणे या माध्यमातून देऊ शकणार आहे. सरकार जनतेच्या सर्व सूचना, शिफारशी ऐकण्यास तयार आहे. आता सर्वांनी या पोर्टलचा वापर करावा. स्थानिक भाषेचा वापर या पोर्टलवर करता येणार आहे.
यावेळी माहिती तंत्रज्ञानमंत्री जेनिफर मोन्सेरात, माहिती तंत्रज्ञान सचिव संजयकुमार, माहिती तंत्रज्ञान संचालक विवेक एच. पी. आदी उपस्थित होते.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या