गोमंतकियांच्या आरोग्याशी सरकार खेळतेय 

dainik gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

कोविड - १९ या महामारीचा प्रसार वेळीच रोखण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याच्या सूचना मार्चपासून करण्यात येत आहे मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लोकांना न घाबरण्याचे फक्त आवाहन करत आले आहेत.

पणजी

राज्यामध्ये कोविड - १९ चा प्रसार दिवसेंदिवस वाढत असतानाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अजूनही हा प्रसार सामाजिक की स्थानिक संसर्ग आहे यावरच अडून आहेत. ते लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. या महामारीसाठी आवश्‍यक साधनसुविधांचा अभाव आहे. वारंवार मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करून लोकांमध्य संभ्रम निर्माण करत आहेत. कोरोना बाधिताला व त्याच्या कुटुंबाला सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी केला. 
कोविड - १९ या महामारीचा प्रसार वेळीच रोखण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याच्या सूचना मार्चपासून करण्यात येत आहे मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लोकांना न घाबरण्याचे फक्त आवाहन करत आले आहेत. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजनांकडे 
दुर्लक्ष झाल्याने तसेच वेळोवेळी ठोस निर्णय घेण्यात ते अकार्यक्षम ठरल्यानेच ही गोव्यावर पाळी आली आहे व ते अनभिज्ञपणे झालेले मुख्यमंत्री आहेत हे सिद्ध पुन्हा एकदा उघड झाले आहे. गोमंतकियांनी या कोविड - १९ च्या महामारीत सहकार्य केले आहे मात्र सरकार लोकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आले आहे. कोविड - १९ चाचणी ही योग्य प्रकारे होत आहे की नाही याबाबतही प्रश्‍नचिन्ह आहे. कमकुवत प्रशासन व राज्याला योग्य नेतृत्व नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. गोवा राज्य हे ग्रीन झोनमध्ये होता तर तो आता कोणत्या झोनमध्ये आहे हे त्यांनी अजूनही उघड केलेले नाही. परिस्थितीनुसार ते एखादा सरडा जसे रंग बदलतो तसे ते निर्णय बदलत आहेत व लोकांना अधिक अडचणीत टाकत आहे असे खंवटे म्हणाले. 
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे लोकांना सुरुवातीला घाबरण्याची गरज नाही असे सांगत होते मात्र आता ते लोकांना स्वतःच काळजी घ्या असे सूचित करत आहेत. लोकांमध्ये जागरूकता करण्यापेक्षा मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न कणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे सांगून कायद्याची भीती दाखवत आहेत. राज्यात खाण व पर्यटन व्यवसाय बंद आहेत. हॉटेल व्यवसायाला जर परवानगी दिली तर मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येऊ लागतील. त्यांनी कोविड - १९ चाचणीचे प्रमाणपत्र दाखविल्यास त्यांना गोव्यात येण्यास परवानगी दिली जाणार आहे. गोव्यात १४४ कलम लागू असताना ते पर्यटकांना लागू होणार नाही का? हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देऊन कसिनोला मागील दाराने परवानगी देण्याचा या प्रयत्न आहे असा आरोप आमदार रोहन खंवटे यांनी केला. 
कोविड - १९ विरोधात लढा देण्यासाठी आवश्‍यक असलेली पीपीई किटस् तसेच चाचणी किटस् सरकारकडे नाहीत. या सरकारची वर्तणूक आकसपणाची आहे. गोवा राज्य सध्या मुख्यमंत्री डॉ. सावंत व मंत्री मायकल लोबो हे चालवत आहेत. मार्गदर्शक सूचनांमध्ये 
शिथिलता लोबो यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री करत आहेत. या दोघांच्या कटकारस्थानातून उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजागवकर यांना हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात येईल असे त्यांच्या तोंडून वदवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्री लोबो हे अनेक घटकांशी आपले संबंध वाढवत आहे व लगेच त्यांच्याविरुद्धही वागत आहेत. ते स्वतः जिल्हाधिकारी बनत अधिकार गाजवत आहेत तर कधी विज्ञानातील संदर्भ संशोधक बनत आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

कळंगुट येथील एक वृद्धा मुंबईहून आली होती तो कोरोना बाधित सापडली होती. तिची चाचणी न होताच तिने गोव्यात प्रवेश केला होता. तिच्यासह विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्यांचे काय झाले? त्यातील कितीजणांच्या चाचण्या करण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास किती करायचा हे सुद्धा मुख्यमंत्री व मंत्री लोबो हे ठरवत आहेत. त्यामुळे या चौकशीची श्‍वेतपत्रिका जारी करून लोकांसमोर माहिती उघड करण्याची मागणी आमदार रोहन खंवटे यांनी केली. 
 

 
 

संबंधित बातम्या

फोटो फीचर