सरकारने लाभार्थ्यांची रक्कम बँकेत जमा करावी

वार्ताहर
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

प्राप्ती महिला फेडरेशनची समाज कल्याण खात्याकडे मागणी

तेरेखोल: गोवा सरकारच्या समाज कल्याण खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेतील २९३२ लाभार्थी पेडणे तालुक्यांत अद्याप या योजनेपासून वंचित असून या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत मागील सहा महिन्यापासून योजनेचे पैसे जमा झालेले नसल्याने लाभार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.या योजनेचे लाभार्थी सरकारच्या नावाने आगडोंब करीत असल्याने सरकारने वंचित लाभार्थ्यांच्या खात्यांत तात्काळ रक्कम भरणा करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी प्राप्ती महिला फेडेरेशनतर्फे फेडेरेशनचे अध्यक्ष  नारायण रेडकर यांनी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या समाजकल्याण खात्यातर्फे विधवा महिला,जेष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती तसेच अन्य विविध योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याकाठी मिळत असलेले पैसे बँकेच्या खात्यांत जमा होणे अनेक महिन्यांपासून बंद आहेत.काहींना दोन ते तीन तर काहींच्या खात्यांत सहा सात महिन्यांपासून जमा झालेले नाहीत.अनेक लाभार्थी आपल्या पैशांसाठी बँकेत वारंवार हेलपाटे मारीत आहेत.त्यामुळे आधारहीन असलेल्या तसेच याच पैशांवर गुजराण असलेल्या लाभार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.अनेकजण बँकेत येऊन सरकारच्या नावाने हैदोस माजवताना दिसतात.

पैसे मिळण्यास उशीर झाल्याने समाजसेवक किंवा लाभार्थ्यांच्या नातेवाईकांनी समाजकल्याण खात्याकडे यासंदर्भांत चौकशी केल्यानंतर पणजी पाटो येथील श्रमशक्ती भवन मध्ये असलेल्या (जी.ए.एल.) गाल कार्यालयांत संपर्क साधण्याची सूचना केली जाते.संबंधित कार्यालयांत संपर्क साधल्यावर लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे,काहीं लाभार्थ्यांचे पत्ते चुकलेले आहेत.तर काहींच्या  कागदपत्रांची छाननी करण्याची गरज आहे,सर्वेक्षणासाठी घरी आल्यावर लाभार्थ्यांची भेट होत नाही आदी विविध कारणे पुढे केली जातात.प्रत्येकवेळी कांहींना कांही का रणे पुढे करून वेळ मारून नेली जात आहे.सरकारने या लाभार्थ्यांना अधिक झुलवत ठेवण्यापेक्षा एक तर पैसे खात्यांत जमा न करण्याचे कारण स्पष्ट करावे किंवा तात्काळ त्यांच्या बँक खात्यांत हप्त्यांची रक्कम जमा करून अनेक महिने या योजनेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी प्राप्ती महिला फेडरेशनतर्फे फेडेरेशनचे अध्यक्ष नारायण रेडकर यांनी केली आहे.
 

संबंधित बातम्या